Kolhapur: अभिनेता गोविंदाने महिला मेळाव्यात नृत्य करून उपस्थितांची जिंकली मने
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:53 PM2024-04-29T16:53:06+5:302024-04-29T17:07:07+5:30
गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांची गर्दी
इचलकरंजी: महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंचरत्न कार्यालयात ताराराणी पक्षाच्यावतीने महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास सिनेअभिनेता, शिवसेना नेते गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी गोविंदाला नृत्य करण्याची विनंती केली. त्याला मान देत गोविंदाने खुदर्गज चित्रपटातील गाण्यावर दिल से ना... या गाण्यावर नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली. गोविंदासोबत सेल्फी घेण्यासाठी यावेळी महिलांनी गर्दी केली.
मेळाव्यात बोलताना गोविंदा म्हणाले, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांमध्ये जी प्रगती झाली आहे, तितकी प्रगती यापूर्वी झालेली नव्हती. पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशामध्ये फुगडीचे राजकारण चालू आहे. मात्र, चांगला विचार करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, लखपती दीदी बनविण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी बघितले आहे. मात्र, यापूर्वीच आमच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला लखपती झाल्या आहेत. महिलांना साडी उत्पादन आणि बाहुल्या निर्मितीचा उद्योग उपलब्ध करून देणार आहे. तसेच पाणीप्रश्नही सोडविणार आहे.
शिवसेनेच्या उपनेत्या शितल म्हात्रे म्हणाल्या, संजय राऊत हे खंजिर खुपसल्याची भाषा करीत आहेत. मात्र, त्यांच्याकडे विकासाचा कोणताही रोड मॅप नाही. मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिरचे स्वप्न पूर्ण केले आहे.
मेळाव्यात वेदांतिका माने, किशोरी आवाडे, अहमद मुजावर, राहुल आवाडे, आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या संयोजिका मौसमी आवाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, मंगला सुर्वे, अर्चना कुडचे, सपना भिसे, सीमा कमते, मेघा माने, प्रकाश मोरे, सुनील पाटील, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते. अंजली बावणे यांनी सूत्रसंचालन व नजमा शेख यांनी आभार मानले.