Kolhapur- अदानी समूहाच्या प्रकल्पाला 'पाटगावा'तील पाणी देणार नाही, सर्वपक्षीयांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 06:47 PM2023-12-27T18:47:00+5:302023-12-27T18:48:03+5:30
लोकप्रतिनिधी सर्व आंदोलक वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन सदरचे काम बंद केले
कडगाव: प्रस्तावित अदानी उद्योग समूहाचा हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पकरिता पाटगाव (ता. भुदरगड) येथील मौनीसागर जलाशयातील पाणी देणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय ठिय्या आंदोलनात घेण्यात आला. यावेळी पाटगाव धरण बचाव कृती समितीच्या आंदोलनाची तीव्रता पाहून वनविभाग प्रशासनाने प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामास तात्पुरती स्थगिती दिली. कोकणातील 'अंजिवडे' येथे अदानी उद्योग समूहाचा हायड्रोलिक इलेक्ट्रिक प्रकल्पास शासनाने मान्यता दिली आहे.
अदानी ग्रुपचे वनविभागाने घालून दिलेल्या अटींच्या विरोधात काम सुरू आहे. अनधिकृत वृक्षतोड व रस्ता तयार करण्यात आला आहे. या कंपनीवर वनविभाग कायद्याने गुन्हा दाखल करावा. तेथील मशिनिरी जप्त करण्यात यावी अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
मागणीचे निवेदन वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना देण्यात आले. वनविभागाने ताबडतोब काम थांबवावे. अन्यथा आंदोलन चालूच राहील, अशी भूमिका घेण्यात आली.
यावेळी तातडीने लोकप्रतिनिधी व आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची संपर्क साधला. आंदोलकांनी आमच्या समोर हे काम बंद करावे व मशीनरी तिथून हलवावी, अशी भूमिका घेतली. यावेळी लोकप्रतिनिधी सर्व आंदोलक वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन सदरचे काम बंद केले.
दरम्यान, सकाळी दहा वाजता कडगाव बस स्थानकावरून मोर्चाला सुरुवात झाली, तब्बल दोन किलोमीटर मोर्चातील हजारो नागरिक पायी चालत वनविभागाच्या कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलनाला दाखल झाले. यावेळी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, अदानी गो बॅक, अशा घोषणांचे बॅनर हातात घेऊन शेकडो लोक आंदोलनात सहभागी झाले होते.
या वेळी बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, मधुकर देसाई, सत्यजित जाधव, के. ना. पाटील, जिल्हा बँक संचालक अर्जुन अबीटकर, गोकुळ माजी संचालक धैर्यशील देसाई, बाबा नांदेकर, अविनाश शिंदे, काशिनाथ देसाई, युवराज येडुरे, विश्वनाथ कुंभार, संदीप वरडेकर, शेखर देसाई, डॉ. नवज्योत देसाई, सुभाष सोनार, प्रकाश वास्कर, अरुण शिंदे,बाबसाहेब देसाई आदी उपस्थिती होते.
आंदोलकांच्या वतीने कॉ. संपत देसाई, कॉ.सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, प्रकाश पाटील, संदीप देसाई, धनराज चव्हाण, सविता चव्हाण, मायकल डिसोझा आदींनी भूमिका मांडली. भुदरगड पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भुदरगड तालुक्यातील जनतेचा विरोध व आमदार प्रकाश आबीटकर सदस्य लोकनेता समिती यांनी विरोध दर्शवला असल्याने अदानी यांच्या बहुचर्चित प्रकल्पास वनविभाग तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्याचे आदेश देत आहे. - जी. गुरुप्रसाद, सहायक वनसंरक्षक कोल्हापूर.