‘आदर्श’च्या अध्यक्षासह आठजणांना अटक-कोेथळीतील फसवणूक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:30 AM2019-02-23T00:30:12+5:302019-02-23T00:30:20+5:30
सहायक धर्मादाय उपायुक्तांचा बोगस आदेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणातील कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिवांसह आठजणांना जयसिंगपूर
जयसिंगपूर : सहायक धर्मादाय उपायुक्तांचा बोगस आदेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणातील कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिवांसह आठजणांना जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात एकूण ११ संशयित आरोपींचा समावेश आहे.
अध्यक्ष आदगोंडा बाबगोंडा पाटील (वय ७७), सचिव बापूसो आण्णा इंगळे (६९), सदस्य सातगोंडा सूरगोंडा पाटील (७१), नेमिशा आण्णा मगदूम (७४), देवाप्पा भाऊ नांद्रे (८०), आण्णा दादा कुरडे (५७), गजेंद्र आप्पासाहेब बोरगावे (५०), राजगोंडा शामगोंडा पाटील (६९, सर्व रा. कोथळी, ता. शिरोळ) या आठ जणांना अटक करण्यात आली असून, संस्थेचे उपाध्यक्ष भीमगोंडा कल्लाप्पा बोरगावे (५०), इजाज अहमद कमरुद्दीन शरिक मसलत (४५, रा. माळी गल्ली, दर्ग्याजवळ, मिरज) व दस्तगीर सिकंदर मुल्ला (रा. हसूर दुमाला, ता. करवीर) अशी अन्य तीन संशयितांची नावे असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.
कोथळी येथील आदर्श शिक्षण संस्थेला अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांचा बोगस आदेश काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाला होता. संशयितांचा तपास केल्यानंतर आदर्श शिक्षण संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवासह नऊ संचालकांची नावे निष्पन्न झाली होती. तर यामध्ये आणखी दोघांचा समावेश आहे. दरम्यान, संशयित आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयानेही अटक पूर्व जामीन फेटाळला होता.
बनावट शिक्का जप्त करण्यासाठी कोठडी हवी
शुक्रवारी (दि. २२) संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले. धर्मादाय आयुक्तांंचा बनावट शिक्का जप्त करण्याबरोबरच हा आदेश कोठे तयार करण्यात आला? हा कट कोठे रचण्यात आला? या गुन्ह्यामध्ये आणखी कोण साथीदार आहेत? याचा सखोल तपास करण्यासाठी संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी केला. यावेळी न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.