ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवाना, पुणे पोलीस रिकामे परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:05 AM2022-04-26T11:05:15+5:302022-04-26T11:05:44+5:30
ॲड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याचवेळी त्याचे वकिलांमार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी दुपारच्या सत्रात होऊन त्याचा जामीन मंजूर केला.
कोल्हापूर : कोल्हापूरपोलिसांनी अटक केलेले वादग्रस्त ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. पण त्यांचा ताबा घेण्यासाठी आलेले पुणे येथील पोलीस हात हलवत परतले. ॲड. सदावर्ते यांची दुपारी पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवानगी केली. तेथून मंगळवारी (दि.२६) पुणे पोलीस ताबा घेणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निकालानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल ॲड. सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांनी ऑर्थररोड कारागृहातून दि. २० एप्रिल रोजी ताबा घेतला. त्याला कोल्हापुरात आणल्यानंतर गुरुवारी (दि. २१) पहाटे अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याचवेळी त्याचे वकिलांमार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी दुपारच्या सत्रात होऊन त्याचा जामीन मंजूर केला.
दरम्यान, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी गिरगाव न्यायालयात ॲड. सदावर्तेचा ताबा घेण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे ते पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले. पण त्याचा ताबा घेण्यात फिर्यादी मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे वकील ॲड. शिवाजीराव राणे यांनी अक्षेप नोंदवला. त्यामुळे ॲड. सदावर्तेंना न घेता पुण्याचे पोलीस रिकाम्या हातांनी परतले.
ॲड. सदावर्ते यांची १५ हजारांच्या जामीन अर्जावर मुक्तता करण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरातील शाहुपुरी पोलिसांनी त्यांची सायंकाळी पुन्हा ऑर्थररोड कारागृहात रवानगी केली. तेथून आज, मंगळवारी पुणे पोलीस त्यांचा ताबा घेण्याची शक्यता आहे.
ॲड. सदावर्तेंच्या घोषणा
सोमवारी सकाळी ॲड. सदावर्ते यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. न्यायालयातून पोलीस बंदोबस्तात बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून ‘संविधान झिंदाबाद, मेरे साथ बोलो जय हिंद’ अशा घोषणा दिल्याने साऱ्यांचे लक्ष वेधले.