व्यसन, संशयावरून मारहाणीच्या तक्रारी : ‘महिला दक्षता’चा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:22 PM2018-06-25T23:22:52+5:302018-06-25T23:23:21+5:30
नवऱ्याला दारूचे व्यसन आणि चारित्र्याचा संशय यावरून आजही महिलांचा मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे चित्र आहे.
इंदुमती गणेश ।
कोल्हापूर : नवऱ्याला दारूचे व्यसन आणि चारित्र्याचा संशय यावरून आजही महिलांचा मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे चित्र आहे. महिला दक्षता समितीकडे वर्षभरात दाद मागण्यासाठी आलेल्या १५० पैकी ९० महिलांची ही तक्रार आहे.
कोल्हापुरातील महिला दक्षता समिती ही अन्यायग्रस्त महिलांना आधार देणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे, पती, पत्नी कुटुंबीयांचे समुपदेशन करणे, तडजोड घडवून आणणे आणि शक्य नसेल तर महिलेला कायदेशीर मदत करणे, तिला स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम करते. समितीकडे महिन्याकाठी सरासरी १५ महिला तक्रार दाखल करतात. त्यांपैकी १० ते १२ तक्रारी या कौटुंबिक छळाच्या असतात. तक्रारीतील तीन ते चार प्रकरणांमध्ये तडजोड होण्यात यश मिळते. बाकी प्रकरणात मग पोटगी, घटस्फोट, पोलीस केस अशी कार्यवाही करावी लागते. काही प्रकरणे वर्षानुवर्षे मिटत नाहीत.
दाखल झालेल्या तक्रारींत लग्नात मानपान झाला नाही, मुलीला कामे करता येत नाहीत, नवरा दारू पिऊन येतो, कामधंदा करत नाही, मी कामाला जाते तर संशयावरून मारहाण करतो, लहान वयात लग्न झाले, घर सोडून आले तर नवरा धमकी देतोय, मूल होत नाही म्हणून औषधोपचारासाठी माहेरच्यांकडे पैशांची मागणी, पहिल्या नवºयापासून झालेले मूल सांभाळायला नवरा तयार नाही, माहेरचा आधार नाही, कुटुंबातीलच अन्य पुरुषांकडून लैंगिक शोषणाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या, संयमाचा कस बघणाºया आणि खºया अर्थाने जगण्याचा संघर्ष कराव्या लागणाºया बाबींचा समावेश असतो.
आई, सासू,नणंदेची लुडबुड
अनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद नसतो; पण मुलीची आई, सासू आणि सासर सोडून आलेली नणंद यांच्यामुळे संसार मोडल्याच्या केसेस येतात. माहेरच्या मंडळींची मुलीच्या संसारातील लुडबुड, नको ते सल्ले आणि सासू, नणंदेकडून जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास हे या कलहाचे मुख्य कारण असते, असे महिला दक्षता समितीच्या सदस्या अनुराधा मेहतायांनी सांगितले.
अल्पवयीन विवाह आणि नात्याविषयी गैरसमज
समितीकडे दाखल होणाºया ६० टक्के तक्रारी गरीब, शिक्षणाचा अभाव असलेल्या कुटुंबांतील महिलांच्या असतात. पालक ओझं कमी करायचं म्हणून मुलगी तेरा-चौदा वर्षांची असतानाच लग्न करून देतात; तर ‘घरात राबायला एक स्त्री आणणं’ एवढीच सासरची मानसिकता असते. पती-पत्नीचे प्रेमळ समजुतीचे नाते, सहजीवन, एकमेकांची साथ, कुटुंबाकडून मुलीचा स्वीकार, लग्न म्हणजे काय हेच माहीतच नसल्याने छळवणूक होते. काही प्रकरणांत लहान मुलांना छळवणुकीचे हत्यार केले जाते. मुले आईपासून दूर केली जातात.
पोलिसांचा वाईट अनुभव
हे काम करताना समितीच्या सदस्यांना व तक्रार दाखल करणाºया महिलांना पोलिसांकडूनच खूप वाईट अनुभव येतो. पोलीस तक्रार घ्यायला टाळतात. तक्रार घेतलीच तर नवºयावर कारवाई करण्याऐवजी महिलेलाच ‘नसत्या भानगडीत पडू नको’ म्हणत न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात.
आर्थिक फायदा होणार असेल तर प्रकरणात लक्ष घातले जाते. एखादाच संवेदनशील पोलीस मनापासून काम करतो; अन्यथा पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा खूप वाईट अनुभव असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.
महिला पुढारलेल्या असल्याचे समाजात चित्र दिसत असले तरी त्याची दुसरी बाजू अत्यंत भयावह आहे. त्यामुळे पालकांनी मुलीला शिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केल्याशिवाय लग्नाची घाई करू नये. मुला-मुलींच्या अपेक्षा, विवाहपूर्व समुपदेशन, लैंगिक शिक्षणाविषयी जागरूक राहिले पाहिजे.
- तनुजा शिपूरकर, सदस्या, महिला दक्षता समिती