भर उन्हाळ्यात आईस्क्रिम विक्रेते पडले थंडगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:38+5:302021-05-09T04:23:38+5:30
कोल्हापूर : उन्हाने काहिली झालेल्या शरीराला आईस्क्रिमच्या थंडाव्यामुळे दिलासा मिळतो. नुसते आईस्क्रिमचे नाव जरी काढले तरी आपण विरघळून ...
कोल्हापूर : उन्हाने काहिली झालेल्या शरीराला आईस्क्रिमच्या थंडाव्यामुळे दिलासा मिळतो. नुसते आईस्क्रिमचे नाव जरी काढले तरी आपण विरघळून जातो. अशा जिवाला थंडावा देणाऱ्या जिल्ह्यातील आईस्क्रिम उद्योगाला मात्र महापुरासह कोरोना संसर्गामुळे सुमारे १६०० कोटींचा फटका बसला आहे. जिल्ह्यात तीन मोठे, तर ३५० हून मध्यम व छोटे उत्पादक-विक्रेते आहेत.
आईस्क्रिम म्हटले की, चिमुरड्यांपासून ते ज्येष्ठांपर्यत नुसत्या उच्चाराने तोंडाला पाणी सुटते. त्यात उन्हाळ्यात चौपाटी असो वा खाऊगल्ली अथवा ठरलेल्या दुकानांमध्ये आईस्क्रिम खायला येणाऱ्यांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत चारपटीने जास्त असते. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातील काही दिवस आईस्क्रिम उत्पादकांसह विक्रेत्यांचा मुख्य हंगाम मानला जातो. गेल्या दोन वर्षांत कोल्हापुरातील आईस्क्रिम व्यवसायाला घरघर लागली आहे. पहिला फटका २०१९ मध्ये महापुराचा बसला. त्यानंतर ऐन उन्हाळ्यात कोरोना संसर्ग वाढला. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये हंगाम संपला. त्यानंतर पुन्हा गाडी रुळावर येईल, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली. या कालावधीत बँकांची कर्जे थकली. अनेक आईस्क्रिम उत्पादनाचे प्रकल्प व मशिनरी विक्रीसाठी काढावी लागली आहे. अनेकांना बँकांनी कर्जांची पुनर्रचना करून दिली आहे. आर्थिक ओढाताण सहन न झाल्याने अनेकजण मातीमोल किमतीने मशिनरी व प्रकल्प विकण्याच्याही तयारीत आहेत.
भीतीमुळे खप कमी..
कोरोनाच्या प्रमुख लक्षणांमध्ये घसा खवखवणे, खोकला, सर्दी ही लक्षणे असल्यामुळे अनेकजण आईस्क्रिम खायला घाबरत आहेत.
चौकट
शेतकऱ्यांनाही फटका
आईस्क्रिम तयार करण्यासाठी दूध महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीही या व्यवसायावर निर्भर आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादक ग्रामीण भागातून दूध खरेदी करतात; मात्र या कालावधीत उत्पादकांकडून दूधच खरेदी झाले नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला.
चौकट
आईस्क्रिम दुकाने - ३५० हून अधिक
उत्पादक - मोठे - ३, मध्यम १२, छोटे - २५
कर्मचारी संख्या - १५००० हून अधिक
कोट
जिल्ह्यात आईस्क्रिम व्यवसायावर सुमारे १५ हजारांहून अधिकजण कार्यरत आहेत. या व्यवसायाला १६०० कोटींचा गेल्या दोन-तीन वर्षांत फटका बसला आहे. या उद्योगाला सरकारने कृषी उत्पन्नामध्ये समाविष्ट करून अर्थसहाय्य केल्यास हा उद्योग तग धरू शकेल.
मनोहर शर्मा,
आईस्क्रिम उत्पादक, कोल्हापूर.