तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुन्हा बेरीज-वजाबाकीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:23 PM2021-11-25T13:23:25+5:302021-11-25T13:24:12+5:30
संतोष मिठारी कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले ...
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात शालेय शिक्षणाचा ६० टक्के वेळ वाया गेल्याचे युनोस्कोच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणावर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने, तर काही ठिकाणी समूह अध्यापन स्वरूपात भरत आहेत. त्यामुळे अंक आणि अक्षर ओळख अनेक विद्यार्थ्यांना झालेली नाही. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम होण्याकरिता इयत्ता तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषेसह बेरीज, वजाबाकी शिकविण्यावर पुन्हा भर दिला जाणार आहे. चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये शिकविली जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील एकूण शाळा : ३७१५
शासकीय शाळा : २१२०
खासगी शाळा : १५९५
पुन्हा नव्याने सुरुवात
- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान अभियानात विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन त्यांना अंक आणि अक्षर ओळखण्याबाबत आवश्यक शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे.
-शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे आम्ही शिक्षक स्वागत करीत असल्याचे वसंतराव चौगुले विद्यालयातील शिक्षक संतोष आयरे यांनी सांगितले.
चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत कौशल्ये
इयत्ता तिसरीबरोबरच चौथी-पाचवीच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार, भाषेतील वाचन-लेखन, जोडशब्द, आदी मूलभूत कौशल्याचे धडे शाळांतून दिले जाणार असल्याचे नेहरूनगर विद्यालयातील शिक्षक संजय पाटील यांनी सांगितले.
अ, ब, क, ड येईना, विद्यार्थी-पालक परेशान
कोरोनामुळे वर्ग प्रत्यक्षात भरले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. माझा मुलगा गेल्या वर्षी पहिलीमध्ये होता. मात्र, त्याला अ, ब, क, ड येईना म्हणून यावर्षी त्याला पुन्हा पहिलीच्या वर्गात बसविले आहे. -उमा पाटील, शिये
माझी मुलगी इयत्ता दुसरीत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे तिच्या शिक्षणावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी, अक्षर ओळख, आदींबाबतचे शिक्षण देण्याचा निर्णय चांगला आहे. विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडणार नाही याची काळजी शाळांनी घ्यावी. -दीपक मुधोळकर, गोकुळ शिरगाव
विद्यार्थी म्हणतात
ऑनलाइन वर्गात मला काही समजत नव्हते. मात्र, माझ्या शाळेने कमी विद्यार्थ्यांचे गट करून शिकविण्यास सुरुवात केल्याने चांगले समजू लागले. वर्ग पूर्वीप्रमाणे सुरू व्हावेत. -अनुप्रिया वळवी, इयत्ता तिसरी
कोरोनामुळे प्रत्यक्षात वर्गात जाता येत नाही. ऑनलाइन तासामध्ये जे काही समजत नव्हते ते मी आईकडून समजून घेत होतो. त्यामुळे माझा अभ्यास सोपा झाला. -शिवसमर्थ सागावकर, इयत्ता दुसरी
कोरोनामुळे राज्य शासनाने अद्याप ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी, तर शहरात सातवीपर्यंतचे वर्ग ऑफलाइन भरविण्यास परवानगी दिली नाही. या विद्यार्थ्यांना ऑनलाइन, समूह अध्यापन पद्धतीद्वारे शिक्षण दिले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्यावर भर दिला जाणार आहे. -एस. के. यादव, प्रशासनाधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण समिती