गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त खते व औषधांचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:38 AM2021-05-05T04:38:11+5:302021-05-05T04:38:11+5:30
कागल : कागल तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व मोठ्या गारपिटीमुळे ...
कागल : कागल तालुक्यात आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व मोठ्या गारपिटीमुळे विविध पिकांसह ऊस क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सेनापती कापशी, शेंडूर परिसरातही मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान अंशतः भरून काढण्याच्या दृष्टीने अशा नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाहू साखर कारखान्याच्या वतीने क्रेडिटवर अतिरिक्त रासायनिक खताचा डोस व औषधे पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या भागाला भेट दिल्यानंतर ही बाब समोर आली. जवळपास एक हजाराहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या गारपिटीचा फटका बसला आहे. त्यानुसार लागण हंगाम 2020-21 करिता शाहूकडे नोंद झालेल्या ऊस क्षेत्रास कारखान्यामार्फत वाढीव रासायनिक खत (युरिया) व विद्राव्य खत, बुरशीनाशक औषधांचा सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना क्रेडिटवर डोस देण्यात येणार आहे. त्यामध्ये युरिया एक पोते, १९ः१९ः१९ विद्राव्य खत दोन किलो, मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो सागरिका द्रवरूप खत एक लिटर, बाविस्टीन बुरशीनाशक एक नग याप्रमाणे एकरी खते व औषधे यांचा समावेश आहे. ती सर्व उधारीवर व बिनव्याजी पुरवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यात करण्यात येणार नसून व्याजाचा भार कारखाना उचलणार आहे. याचा फायदा कापशी सेंटरकडील जैन्याळ नंद्याळ करड्याळ अर्जुनवाडासह शेंडूर सेंटरकडील दहा गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे.