कोल्हापूरचे अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:01 PM2020-01-15T12:01:24+5:302020-01-15T12:02:19+5:30
कोल्हापूर येथील अॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
कोल्हापूर : येथील अॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी न्यायाधीश बोरकर यांना अतिरिक्त न्यायाधीश पदाची शपथ दिली. मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या बोरकर यांनी जुलै १९९४ ते मे १९९७ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा, दिवाणी न्यायालयांसह अन्य प्राधिकरणांवर काम केले आहे. त्यांनी दिवाणी, घटनात्मक, सहकार, शिक्षण, व्यापार कायदे, शैक्षणिक, सेवा, आदी विषयांतील खटल्यांचे कामकाज पाहिले आहे.
जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत. सन २००९ पासून त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून काम पाहिले. याखेरीज महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचेही विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
न्या. बोरकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शनिवार ब्रँच शाळा, न्यू हायस्कूल येथे झाले. विवेकानंद महाविद्यालय व शहाजी विधि महाविद्यालय येथे उच्च शिक्षण झाले आहे.