खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा जप्त
By admin | Published: October 24, 2015 12:10 AM2015-10-24T00:10:45+5:302015-10-24T00:21:47+5:30
जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई : कागलच्या बरकत नायकवडी यांच्यावर गुन्हा दाखल
कागल/कोल्हापूर : खाद्यतेलाचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी कागल येथील बरकत नायकवडी यांच्यावर गुरुवारी (दि. २२) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले. इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना न दाखविलेल्या डाळ आणि खाद्यतेलाची चार दुकाने सील करण्यात आली. शुक्रवारी पुरवठा विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापे टाकून दुकाने व गोदामांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवाळीपर्यंत ही धडक कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केला असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर बुधवार (दि. २१)पासून छापे टाकून धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे ९५ लाख रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. पुरवठा कार्यालयाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी या खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. याबाबत या कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाने गुरुवारी कागल येथे धडक कारवाई केली. यामध्ये किरकोळ खाद्यतेल परवानाधारक बरकत नायकवडी यांच्याकडे मर्यादेपेक्षा म्हणजे २० क्विंटलपेक्षा अधिक २८.६१ क्विंटल इतका साठा आढळल्याने तो ताब्यात घेण्यात आला. याबाबत त्यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत क-७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी प्रांत मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे उपस्थित होते.
इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना उपलब्ध करून न दिल्याबद्दल खाद्यतेलाची दोन व डाळीची दोन दुकाने सील केली. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. शुक्रवारीही रात्री उशिरापर्यंत शाहू मार्केट यार्डसह शहराच्या विविध भागांतील दुकाने व गोदामांची तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी)