राजाराम कारखान्यासाठी हातकणंगले तालुक्यात जोडण्या, गट दोनकडे विशेष लक्ष; पाटील-महाडिक यांचा प्रचाराचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 06:17 PM2023-03-15T18:17:19+5:302023-03-15T18:18:07+5:30
निर्णायक मतांचा गठ्ठा असल्याने येथे चुरशीच्या जोडण्या सुरू
आयुब मुल्ला
खोची : राजाराम साखर कारखान्याच्या प्रचाराची खडाखडी हातकणंगले तालुक्यात जोमाने सुरू झाली आहे. थेट सभासद भेटीला महत्व देऊन नेते मंडळी गावागावात पोहचली आहेत. विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील व सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक यांनी पहिल्या टप्प्यात हातकणंगले तालुक्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. सभासद बैठका, संवाद भेट यातून दोन्ही बाजूकडून भूमिका मांडली जात आहे. निर्णायक मतांचा गठ्ठा असल्याने येथे चुरशीच्या जोडण्या सुरू झाल्या आहेत.
हातकणंगले तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे ५४१२ इतके मतदान आहे. गत वेळेच्या निवडणुकीत महाडिक गटाला हातकणंगले तालुक्याने साथ दिल्याने सत्ताधारी गटाचा विजय सोपा झाला. तर सतेज पाटील गटाला इतर ठिकाणी चांगली साथ मिळाली होती. व हातकणंगले तालुक्यात शंभरच्या आसपास कमी मतदान झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी हाच तालुका पुन्हा लक्षवेधी बनला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हातकणंगले तालुक्यात दररोज संपर्कात आहेत. कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी सतेज पाटील गटात प्रवेश केल्याने सतेज पाटील गटाला चांगलेच बळ मिळाले आहे. तर नव्या राजकीय मांडणी नुसार कोरे, आवाडे, माने गट यांची रसद महाडिक गटाला मिळणार आहे. आमदार राजू आवळे, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट सतेज पाटील गटाबरोबर राहणार आहे.
सध्या बाकीचे नेते त्यांचे कार्यकर्ते उघड प्रचारात नसले तरी पाटील-महाडिक यांचे कार्यकर्ते मात्र जोरकसपणे प्रचारात सक्रिय झाले आहेत. सभासदांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. गेल्या दोन दिवसात सतेज पाटील यांनी तासगाव, मौजे वडगाव, मिणचे, सावर्डे येथे बैठका घेतल्या. तर अमल महाडिक यांनी लाटवडे येथून बैठका, भेटीगाठी घेत प्रचार सुरू केला. भेंडवडे,खोची,हालोंडी येथे सभासदांच्या भेटी घेतल्या. या दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करीत निवडणुकीत चांगलीच रंगत ईर्षा निर्माण होण्याची संकेत दिले आहेत.
महाडिक गटाने संस्था गटातील सभासदांच्या भेटीसाठी स्वतंत्र टीम केली आहे. यामध्ये वडगाव बाजार समितीच्या संचालकांचा समावेश आहे. कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सुरेश पाटील, बाळकृष्ण बोराडे, अमरसिंह पाटील, श्रीकांत पाटील, संभाजी महाडिक हातकणंगले तालुक्यातील महाडिक गटाचे कार्यकर्ते प्रचारात आहेत. तर सतेज पाटील गटाकडून कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, उत्तम सावंत, महेश चव्हाण आदी सक्रिय सहभागी असतात.
गट दोनकडे विशेष लक्ष
नागावपासून कुंभोज परिसरापर्यंत गट क्रमांक दोन आहे. या गटामध्ये अमल महाडिक यांची उमेदवारी असते. यामुळे सत्ताधारी गटाने आपले लक्ष येथे अधिक केंद्रित केले आहे. तर याच गटात विरोधी गटातून माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी उमेदवारी असणार आहे. सतेज पाटील यांनी सर्वात जास्त संपर्क व प्रचाराचे प्रभावी नियोजन याठिकाणी केले आहे.