'चांद्रयान-२' मोहिमेत सीमाभागातील केरबा लोहारांचे अतुलनीय योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 06:37 PM2019-09-09T18:37:36+5:302019-09-09T20:08:45+5:30
देशाचे सर्वोच्च स्वप्न असलेल्या चांद्रयान मोहिमेबद्दल देशभर भारतीय अवकाश संशोधन संस्थेवर (इस्त्रो) कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोल्हापूर : देशाचे सर्वोच्च स्वप्न असलेल्या चांद्रयान मोहिमेबद्दल देशभर भारतीय अवकाश संशोधन संस्थेवर (इस्त्रो) कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मोहिमेत सहभागी असलेल्या निपाणीजवळच्या आडी गावचे सुपुत्र केरबा लोहार यांचे सीमाभागात कौतुक होत आहे.
४७ वर्षीय केरबा लोहार यांचे प्राथमिक शिक्षण आडी येथील शाळेत झाले. सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बेळगावच्या शासकीय पॉलिटेक्नीकमध्ये डिप्लोमा केला.
जिद्दीने शिक्षण घेत त्यांनी १९९४ मध्ये तांत्रिक सहाय्यक म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्थेत नोकरीसाठी अर्ज केला. नोकरीत असतानाही बंगळूरुच्या बीएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समधून एमईचे शिक्षण पूर्ण केले. ते गेली २५ वर्षे या संस्थेत काम करत असून सध्या ते वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत आहेत.
केरबा लोहार यांनी इस्त्रोमध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. चांद्रयानची पहिली मोहिम असो, की मंगलयान, जीएसएलव्हीचे प्रक्षेपण असो लोहार यांची भूमिका महत्वाची होती. दुस-या चांद्रयान मोहिमेतही त्यांचा वाटा सिंहाचा आहे. या मोहिमेसाठी उपग्रहामध्ये आॅर्बिट, लँडर आणि रोव्हरचे काम महत्वाचे आहे. या तीन्ही भागासाठी लागणारे सेन्सर डिझाईन करण्याचे महत्वाचे काम केरबा यांच्याकडे आहे.
१९७२ मध्ये जन्मलेल्या केरबा यांचे आई, वडील आणि भाउ आणि त्यांचे कुटूंबिय आडी येथेच वास्तव्यास आहेत. केरबा हे बंगळूरुमध्ये पत्नी आणि मुलासह राहतात. वेळोवेळी ते गावी येत. चांद्रयान मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाल्यापासून मात्र ते गावी आलेले नाहीत.
गेल्यावर्षी दत्तजयंती आणि श्रावण महिन्यात ते गावी येउन आईवडीलांची भेट घेउन गेले होते. वडील पूर्वी लोहारकाम करत. त्यातूनच त्यांनी मुलांना शिकविले. त्यांचे बंधू शिवाजी हे जवळच्या गजबरवाडी येथील शाळेत शिकवतात. चांद्रयान मोहिमेतील त्यांच्या सहभागामुळे आडीसारख्या गावात त्यांचे कौतुक होत आहे.