आदिल फरास यांची कॉमर्स कॉलेजमध्ये दमदाटी

By Admin | Published: July 14, 2016 12:47 AM2016-07-14T00:47:32+5:302016-07-14T00:47:32+5:30

गाडी लावल्यावरून वाद : प्राध्यापकास धक्काबुक्की

Adil Faras commits to commerce college | आदिल फरास यांची कॉमर्स कॉलेजमध्ये दमदाटी

आदिल फरास यांची कॉमर्स कॉलेजमध्ये दमदाटी

googlenewsNext

कोल्हापूर : येथील कॉमर्स कॉलेजच्या आवारात गाडी लावल्यावरून झालेल्या वादात माजी नगरसेवक आदिल फरास यांनी कॉलेजमधील प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील यांना बुधवारी दमदाटी केली. त्यांना धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. कॉलेज सुटण्याच्या दरम्यानच हा प्रकार घडल्याने मोठा गोंधळ उडाला. या घटनेचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. परंतु, कॉलेज व्यवस्थापनाने मात्र यासंबंधी पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह प्राचार्यांना भेटण्यासाठी फरास बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास कॉलेजमध्ये गेले होते. त्यांच्या चालकाने गाडी थेट कॉलेजच्या पायऱ्यांपर्यंत नेली. त्याला शिपायांनी हरकत घेतली. संस्थेच्या विश्वस्तांचेच वाहन फक्त पुढे येण्याची परवानगी आहे, तुमची गाडी मागे घ्यावी, असे शिपायांनी फरास यांच्या चालकाला सांगताच त्याने मग्रुरीच्या स्वरात ‘ही गाडी कुणाची आहे तुम्हाला माहीत आहे का?’ अशी विचारणा केली. त्यातून वाद सुरू झाला. चालक दादागिरी करीत असल्याचे पाहून शिपायांनी ही माहिती क्रीडाशिक्षक प्रकुल मांगोरे-पाटील यांना दिली. त्यांनी येऊन चालकास गाडी मागे घेण्याची सूचना केल्यावर त्याने ही माहिती फरास यांना दिली. ते बाहेर आल्यावर त्यांनी सुरुवातीला शिपायांशी व नंतर प्रा. मांगोरे यांच्याशी वाद घातला. शब्दाने शब्द वाढत गेल्यावर फरास हे मांगोरे यांच्या अंगावर धावून गेले. प्रा. मांगोरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी वरिष्ठ महाविद्यालय सुटले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी उसळली.
‘कॉलेज सुटल्यावर भेटा, बघून घेतो,’ अशी भाषा फरास करीत होते. नंतर त्यांना प्रा. मांगोरे हे ‘केएसए’चे पदाधिकारी संभाजीराव मांगोरे-पाटील यांचे चिरंजीव असल्याचे समजताच ते चांगलेच नरमले. त्यांनी संभाजीराव मांगोरे यांची भेट घेऊन आपल्याकडून काही चूक झाली नसल्याची सारवासारव केली. मार्च महिन्यातही पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्यांच्या दोन गटांत कॉलेजच्या आवारात जोरदार हाणामारी झाली होती. त्यावेळी पोलिसांनीच स्वत:हून तक्रार दिली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Adil Faras commits to commerce college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.