‘स्थायी’वर आदिल फरास यांची बाजी

By admin | Published: January 2, 2015 11:47 PM2015-01-02T23:47:31+5:302015-01-03T00:15:52+5:30

महापालिका निवडी : १३ विरुद्ध २ मतांनी मृदुला पुरेकर पराजित; ‘महिला बालकल्याण’पदी लीला धुमाळ, उपसभापतिपदी रेखा आवळे

Adil Faras' stakes on 'Permanent' | ‘स्थायी’वर आदिल फरास यांची बाजी

‘स्थायी’वर आदिल फरास यांची बाजी

Next

कोल्हापूर : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महानगरपालिकेच्या ३७व्या स्थायी समिती सभापतिपदी आज, शुक्रवारी राष्ट्रवादीचे आदिल फरास यांनी बाजी मारली. त्यांनी जनसुराज्य पक्षाच्या उमेदवार मृदुला पुरेकर यांच्यावर १३ विरुद्ध २ मतांनी विजय मिळविला.
महिला व बालकल्याण सभापतिपदी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ, तसेच उपसभापतिपदी रेखा आवळे यांची बिनविरोध निवड झाली; तर उत्कंठा लागून राहिलेल्या परिवहन सभापतिपदाची निवड न्यायालयाच्या आदेशामुळे तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी घेतला. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली व जोरदार आतषबाजी करीत जल्लोष केला.
सकाळी साडेदहाच्या सुमारास कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवरून थेट महापालिकेत आले. जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थायी सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादीतर्फे आदिल फरास, तर जनसुराज्य पक्षातर्फे मृदुला पुरेकर यांनी अर्ज दाखल केला होता. १५ सदस्यांनी हात वर करून मतदान केले. भाजपच्या प्रभा टिपुगडे गैरहजर राहिल्या. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कोट्यातील १३ मते फरास यांना मिळाली, तर शिवसेनेचे संभाजी जाधव यांनी पुरेकर यांना साथ दिली. शिवसेना व भाजपने पुरेकर यांना पाठिंबा दिला. महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या लीला धुमाळ यांचा एकच अर्ज आल्याने निवडीची जिल्हाधिकाऱ्यांनी घोषणा केली. उपसभापतिपदी रेखा आवळे यांचीही बिनविरोध निवड झाली.
कॉँग्रेसचे अजित पोवार व ‘जनसुराज्य’चे प्रकाश नाईकनवरे यांनी परिवहन सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले होते. स्वीकृत सदस्य शशिकांत पाटील यांची पोवार यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही असल्याने याबाबत आक्षेप घेत त्यांचा अर्ज बाद ठरविण्याची विनंती नाईकनवरे यांनी न्यायालयास केली होती. याबाबत महापालिका आयुक्त, नगरसचिव व पीठासन अधिकारी जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन ९ जानेवारीपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोवार व नाईकनवरे यांनी वकिलांची फौज बाजू मांडण्यासाठी आणली होती. वकिलांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. नाईकनवरे यांनी लेखी अर्जाद्वारे बाजू मांडली. यानंतर न्यायालयीन प्रक्रिया व निर्णयाचा भाग बनलेल्या परिवहन सभापतिपदाची निवड स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (प्रतिनिधी)


सुस्कारा अन् चिंता
स्थायी सभापतिपदासाठी पुरेकर यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सदस्यांना ‘व्हिप’ बजावले होते. दगाफटका नको, यासाठी सदस्यांना अज्ञातस्थळी हलविले. यातच परिवहन सभापतिपदासाठी कॉँग्रेसच्या अजित पोवार यांचा अर्ज बाद ठरल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे निवडीबाबत कमालीची उत्सुकता व तणाव नगरसेवक ांत होता. ‘स्थायी’च्या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुस्कारा सोडला. मात्र, न्यायालयीन कचाट्यात परिवहन सभापतीची निवड अडकल्याने कॉँग्रेसच्या गोटात शांतता व चिंता होती.


आरोग्य सेवा सुधारण्यावर भर राहील. अंबाबाईच्या दर्शनानिमित्त येणाऱ्या पर्यटक व भाविकांना सुविधा देण्याबाबत मास्टर प्लॅन तयार करणार. रंकाळा व पंचगंगा प्रदूषण मुक्ती हे विषय अग्रक्रमाने विषयपत्रिकेवर असतील. पाईपलाईन व शहरांतर्गत रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती यासाठी पाठपुरावा करू. कारकिर्दीत महापालिकेची रुग्णालये अद्ययावत झालेली दिसतील.
- आदिल फरास, स्थायी सभापती
महिलांना स्वयंरोजगार मिळावा, तसेच समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व वस्तू या वेळेत मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करू. गरजू महिलांना अनुदान स्वरूपात वाटप करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचा दर्जा व उपयोग यांचा ताळमेळ घालून त्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील, याची काळजी घेऊ.
- लीला धुमाळ, सभापती, महिला व बालकल्याण समिती

Web Title: Adil Faras' stakes on 'Permanent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.