पूरपरिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:28+5:302021-07-23T04:15:28+5:30
जयसिंगपूर : धरण क्षेत्रात पडत असलेला मोठा पाऊस, पंचगंगा नदीचे पात्राबाहेर गेलेले पाणी, त्याचबरोबर अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे संभाव्य ...
जयसिंगपूर : धरण क्षेत्रात पडत असलेला मोठा पाऊस, पंचगंगा नदीचे पात्राबाहेर गेलेले पाणी, त्याचबरोबर अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे संभाव्य पूरस्थितीचा धोका ओळखून प्रशासनाला सतर्कतेचे आदेश शासनाने दिले आहेत. खबरदारी म्हणून कोल्हापूर शहर व शिरोळ तालुक्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या कोल्हापूर व शिरोळ येथे दाखल झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाटबंधारे विभागाचे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव विजय गौतम, पाटबंधारे विभागाच्या पुणे विभागाचे अभियंता गुणाले तसेच कर्नाटक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून संभाव्य पूरपरिस्थिती आणि उपाययोजनांबाबत चर्चा केली असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यामध्ये जून २०१९ मध्ये बेंगलोर येथे झालेल्या बैठकीमध्ये धरणांमधील पाणीसाठ्याबाबतचे नियोजन दोन्ही राज्यांनी निश्चित केले असून, या नियोजनामुळे पूरस्थिती ओढवणार नाही याची काळजी घेतली जाईल. याबाबतच्या सूचना कर्नाटक व महाराष्ट्र राज्याचा पाटबंधारे विभागाला दिल्या असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले आहे. सध्या आलमट्टी धरणामधून ९७ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने गुरुवारपासून कोयना धरणातून ११ हजार क्यूसेक्सने नदीपात्रात विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही मंत्री यड्रावकर यांनी केले आहे.
फोटो - २२०७२०२१-जेएवाय-०४-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर