संगणक खरेदीवरून स्थायीतही प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:31 AM2021-02-27T04:31:21+5:302021-02-27T04:31:21+5:30
कोल्हापूर : जलव्यवस्थापन समितीपाठोपाठ स्थायी समितीच्या बैठकीतही संगणक खरेदीचा विषय जोरदार गाजला. खरेदी कुणाला विचारून केली, अशी ...
कोल्हापूर : जलव्यवस्थापन समितीपाठोपाठ स्थायी समितीच्या बैठकीतही संगणक खरेदीचा विषय जोरदार गाजला. खरेदी कुणाला विचारून केली, अशी विचारणा करत सत्ताधाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. राज्य शासनाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत याची सखोल चौकशी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कोविड काळातील खरेदी संदर्भात माहितीची लपवालपवी करत असल्याबद्दल विरोधी सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कात्रीत पकडले. अखेर त्यांनी माहिती व्यक्तिगतरीत्या दिल्यानंतर यावर पडदा पडला.
शुक्रवारी जिल्हा परिषदेत स्थायी समितीची बैठक झाली. गुरुवारी जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत गाजलेला १ कोटी ४८ लाखाचा संगणक खरेदीचा विषय सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी स्थायीच्या बैठकीतही लावून धरला. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासमोर सदस्यांनी पाणीपुरवठा, वित्त व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्या आवाजात जाब विचारला. सदस्य, पदाधिकारी यांना न विचारता, विश्वासात न घेता दीड कोटींच्या खरेदीला मान्यता दिलीच कशी विचारणा विरोधी सदस्य अरुण इंगवले व राजवर्धन निंबाळकर यांनी केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला गेला. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांकडे याबाबतीत पाठपुरावा करण्याचेही ठरले. प्राधिकृत अधिकऱ्यांमार्फतच याची चौकशी व्हावी असेही ठरावात नमूद केले.
चौकट ०१
कोविड खरेदी माहिती देण्यावरून वाद
कोविड काळात झालेल्या खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप सहा महिन्यापूर्वी राजवर्धन निंबाळकर यांनी केला होता. गेल्या महिनाभरापासून सातत्याने मागणी करूनदेखील माहिती मिळत नसल्याने निंबाळकर यांनी स्थायीच्या बैठकीतच या मुद्द्यावरून जाब विचारला. माहिती लपविण्याइतपत यात काय दडले आहे, ते पण जरा कळू द्या, अशा शब्दात टीका केली. बैठक संपल्यानंतर ही माहिती निंबाळकर यांना देण्यात आली.