वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी अधिष्ठातांनी हालचाली केल्या गतिमान थोरल्या दवाखान्या’ची घरघर थांबविण्यासाठी सरसावले प्रशासनही
By admin | Published: May 11, 2014 12:33 AM2014-05-11T00:33:39+5:302014-05-11T00:43:07+5:30
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अखेरची घरघर थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सीपीआर बचाव कृती समिती’ने नुकतेच
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची अखेरची घरघर थांबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सीपीआर बचाव कृती समिती’ने नुकतेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत स्वत: अधिष्ठाता यांनी सर्व विभागप्रमुखांची नुकतीच बैठक घेतली. यामध्ये तत्काळ गरजेचे असणारे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. सीपीआर रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे. रोज हजारो नागरिकांवर मोफत उपचार केले जातात. वाढत्या रुग्णांना सेवा देताना निधी अपुरा पडत आहे. अत्यावश्यक वस्तू व त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची तत्काळ गरज होती. याची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने बर्न विभागातील एअर कंडिशनर तत्काळ दुरुस्त केला आहे.याचबरोबर प्रशासनाच्या अधिकारात जेवढ्या यंत्रणांची तत्काळ दुरुस्ती शक्य आहे, त्या यंत्रणाही लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सीपीआर कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील उपस्थित समस्यांचे निराकरण व यंत्रसामग्री दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सीपीआर प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात यंत्रणाही कामाला लागली आहे. सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. हयगय करणार्या कर्मचार्यांवर कारवाईचे संकेतही अधिष्ठाता यांनी या बैठकीत दिल्याचे समजते. बहुतांश विभागांतील महत्त्वाची उपकरणे बंद आहेत. ती दुरुस्त करण्यासाठीचे तत्काळ प्रस्तावही आरोग्य संचालकांकडे पाठविण्यात आले आहेत. यामध्ये व्हेंटिलेटर, सीटी स्कॅन, प्रयोगशाळा, रक्त विलगीकरण उपकरण, हृदय शस्त्रक्रिया विभागातील महत्त्वाची उपकरणे, अतिदक्षता विभागातील वातानुकूलन, तसेच हृदय शस्त्रक्रिया विभागातील वातानुकूलन यंत्रणाही बंद अवस्थेत आहे. लिथोट्रिप्सी मशीन, एक्स-रे मशीन, डायलेसिस यंत्रणाही नादुरुस्त आहे, तर अस्थिरोग विभागात स्टील प्लेट व वायरही नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयाकरिता स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी अधिष्ठातांची तत्काळ कार्यवाही राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील जागेत हलवावे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी नांदेड येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाची पाहणी अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांनी नुकतीच केली आहे. त्यातील प्लॅन व इस्टिमेटही आणण्यात आले आहेत. याबाबत लवकरच पाठपुरावा करू, असे अधिष्ठाता कोठुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.