प्रशासनाचे ठरेना, स्थलांतरितांना जाता येईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 05:06 PM2020-05-02T17:06:01+5:302020-05-02T17:08:00+5:30
नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.
कोल्हापूर : स्थलांतरितांना आपापल्या गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली खरी पण अजूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीविषयीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून १६ निवारा केंद्रात अडकलेल्या ८३१ जणांचा जीव टांगणीला लागला आहे. घराकडे जायची ओढ लागली आहे, पण जाणार कसे याबाबत काहीच सूचना आलेल्या नसल्यामुळे या स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या स्थलांतरितांना सक्तीने क्वारन्टाईन केले गेले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी पुढील धोका नको म्हणून निवारा केंद्र स्थापन करून त्यांची जेवण व निवासाची सोय सरकारने केली. गेल्या महिन्याभरापासून हे स्थलांतरित येथे रोजचा दिवस ढकलत आहेत. कोल्हापुरात सरकारने या स्थलांतरितांसाठी १६ निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात ८३१ जण आहेत, त्यात १६८ जण राज्यातील तर तब्बल ६६३ जण परराज्यातील आहेत. यात कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, पाँडेचरी, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, हरियाणा या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे.
या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
त्यानुसार समन्वय कक्ष स्थापना आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे प्रशासन सांगत असले तरी अजून कशाचा पायपोस कशाला नाही, अशी परिस्थिती आहे. नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.