स्वच्छतागृहावरून ‘प्रायव्हेट’चे प्रशासन धारेवर

By admin | Published: October 21, 2015 12:36 AM2015-10-21T00:36:56+5:302015-10-21T00:40:22+5:30

पालकांनी विचारला जाब : शाळेतील एका विद्यार्थ्यास डेंग्यू, आठ मुले रुग्णालयात; उपाय न योजल्यास आंदोलन

The administration of 'Private' from the sanitary toilets | स्वच्छतागृहावरून ‘प्रायव्हेट’चे प्रशासन धारेवर

स्वच्छतागृहावरून ‘प्रायव्हेट’चे प्रशासन धारेवर

Next

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमधील विविध शाखांमध्ये अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे अनेक मुले आजारी पडत आहेत. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनसुद्धा कोणीच दखल न घेतल्याने संतप्त पालकांनी मंगळवारी सकाळी प्रशासनाला सुमारे दोन तास धारेवर धरले. यावेळी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पालकांना दिले. उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला.
खासबाग मैदानाजवळील प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात विविध आठ शाखा आहेत. त्यामध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मुला- मुलींसाठी एकूण या ठिकाणी ३२ स्वच्छतागृहे आहे. मात्र, ही स्वच्छतागृहे अपुरी पडत असून वेळोवेळी त्यांची स्वच्छता होत नसल्याने वर्गामध्ये दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे अनेक मुलांना त्याचा त्रास होत आहे. मुलांना नाकाला रुमाल लावून वर्गात बसावे लागते. याबाबत वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासनाकडून दखल न घेता पालकांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती. स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्याने या शाळेतील आठ मुले रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर कुणाल महेंद्र थरवल या विद्यार्थ्याला डेंग्यू झाल्याचे निदान येताच पालक संप्तत झाले.
मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पालक शाळेत जमले. त्यांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारला. त्यांनी ही बाब प्रशासनातील पदाधिकाऱ्यांना सांगू, असे आश्वासन दिले. मात्र, पालकांनी पदाधिकारी येत नाहीत तोपर्यंत येथून कोणीही हलणार नाही, अशी भूमिका घेत मुख्य प्रवेशद्वारासमोर घोषणाबाजी केली.
सुमारे तासाभरानंतर सहकार्यवाहक बी. जी. देशपांडे शाळेत येताच पालकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आम्हाला आश्वासन नको तत्काळ कार्यवाही पाहिजे, अशी भूमिका पालकांनी घेतल्याने पुन्हा गोंधळ झाला. याचदरम्यान संस्थेचे चेअरमन डॉ. अजित भागवत हे येताच पालकांनी त्यांनाही धारेवर धरले. भागवत यांनी संबंधित विद्यार्थी ज्या रुग्णालयात आहेत त्यांची विचारपूस केली जाईल, तसेच तत्काळ स्वच्छतागृहाशेजारील असणारे वर्ग हलविण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर पालक शांत झाले.
दरम्यान, शाळेमध्ये बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या विस्तार अधिकारी एन. एस. गुरसाळे या आल्या होत्या. यावेळी पालकांनी त्यांना येथील स्वच्छतागृहांची पाहणी करण्यास सांगितले. यावेळी गुरसाळे यांनी स्वच्छतागृहांची पाहणी करून प्रशासनास येथील बालवाडी व तिसरीचे वर्ग स्वच्छतागृहापासून इतरत्र हलविण्याबाबत सूचना
दिल्या.
आंदोलनात जयाजी घोरपडे, जयकुमार शिंदे, बाबासाहेब पाटील, फिरोज सरगूर, महेंद्र साळोखे, मंजिरी कुलकर्णी, केतकी देवधर, शिल्पा कांबळे, अनिता शिंदे, शिल्पा मगदूम, स्नेहा सरपोतदार, पल्लवी नलवडे, ज्योती यादव, प्रिया दाबाडे, शीतल खोराटे, दीपाली वंदुरे, शिदीन वंदुरे, शिरीन मोमीन, शिल्पा साबळे, दीपाली काटे, प्रणिता जाधव, माधुरी हावळ, श्वेता चौगुले, सुप्रिया जाधव, विदुला बुगड, फातिमा सय्यद, वैभवी मान, अनेक पालक सहभागी होते.


मुलांना त्रास दिला तर बघा
शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आम्ही आंदोलन केले आहे. आंदोलनात सहभागी पालकांच्या पाल्यास जर शाळा प्रशासनाने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा यावेळी पालकांनी प्रशासनास दिला.


शाळा प्रशासनास जाग
शाळेतील विद्यार्थी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याठिकाणी संस्थेचे चेअरमन डॉ. अजित भागवत यांनी भेट देत त्यांच्या पालकांशी व डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी आंदोलन केल्यानंतरच शाळा प्रशासन जागे झाले काय?, अशी चर्चा पालकांच्यामधून व्यक्त होत होती.



तत्काळ स्वच्छता
सकाळी आंदोलन सुरू असताना भयभीत कर्मचाऱ्यांनी तत्काळ जादा फिनेल टाकून स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचे काम सुरू केले.


काही मुले डब्यातील अन्न स्वच्छतागृहात टाकत असल्याने पाणी तुंबते. याबाबत काही करता येईल हे पाहिले जाईल. स्वच्छतागृहाशेजारील वर्ग तत्काळ अन्यत्र हलविण्यात येईल. स्वच्छतागृह शाळा परिसरात कुठे हलविता येईल, याचीही पाहणी करण्यात येईल.
- डॉ. अजित भागवत, चेअरमन, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी

माझा मुलगा चौथीत आहे. काही दिवसांपूर्वी वर्गात त्याला ताप आला. त्यांची वैद्यकीय तपासणी के ल्यावर डॉक्टरांनी त्याला डेंग्यू झाल्याचे सांगितले. आज ही बाब मी शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणली. तर मलाच विचारतात तुमच्या मुलाला डेंग्यू झाला आहे त्याला काय पुरावा आहे. प्रशासनाचे असे वागणे चुकीचे आहे.
- महेंद्र थरवल (पालक)

Web Title: The administration of 'Private' from the sanitary toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.