Kolhapur: विशाळगडावरील ७० अतिक्रमणे प्रशासनाने बंदोबस्तात हटविली, २१ संशियतांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:17 PM2024-07-16T12:17:40+5:302024-07-16T12:19:22+5:30
जाळपोळीत ५६ कुटुंबांचे नुकसान
कोल्हापूर : विशाळगड (ता. शाहूवाडी) येथील किल्ल्यावर व गजापूर आणि मुसलमानवाडीतील विशिष्ट समाजाच्या घरावर दगडफेक, हल्ले करून जाळपोळ केल्याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांत सुमारे ६० जणांवर सोमवारी गुन्हे दाखल झाले. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि चित्रीकरण पाहून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्यातील २१ जणांना अटक केली. या जाळपोळीत ५६ कुटुंबांचे प्रापंचिक साहित्याचे तसेच ७ कार, ३ मोटारसायकली मिळून सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सकाळी गडावर गेली आणि त्यांनी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम सुरू केली. त्यामध्ये १० खातेदारांच्या भाड्याने दिलेल्या खोल्या, दुकानांची अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. दरम्यान, रविवारच्या घटनेस सर्वांनीच पोलिस व जिल्हा प्रशासनास जबाबदार धरले. त्यांनी पुरेशी दक्षता न घेतल्यानेच ही घटना घडल्याचा आरोपही काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांनी केला. त्यांनी या घटनेमुळे आपल्याला तीव्र वेदना झाल्याचे म्हटले आहे.
नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी ते आज मंगळवारी गडावर जाऊन आजूबाजूच्या गावांतील लोकांना भेटणार आहेत. सायंकाळी कोल्हापुरात झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीतही या घटनेचा निषेध करून आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कुणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्यास तो वेळीच रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.
राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी पीडितग्रस्तांची घेतली भेट
या दंगलीस माजी खासदार संभाजीराजे हेच जबाबदार असल्याने त्यांनाच अटक करावी, अशी मागणी कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी केली. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली करावी, अशी मागणीही जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन देऊन केली. मुस्लीम समाजाने या घटनेचा दसरा चौकात निदर्शने करून जोरदार निषेध केला. या हल्ल्यातील संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांनी कोल्हापुरात केली. त्यांनी सायंकाळी विशाळगडावर जाऊन पीडितग्रस्तांची भेट घेतली.
यापूर्वी अतिक्रमण काढण्यावर कोणाचा दबाव होता?
विशाळगडावर रविवारी जी घटना घडली, त्याला सरकार, जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करतानाच, मी गेल्या दीड वर्षापासून अतिक्रमण काढा म्हणून मागे लागलो होतो, त्याची दखल घेतली नाही. शिवभक्तांचा उद्रेक झाल्यानंतर तुम्ही अतिक्रमण काढण्याचे आदेश देत आहात. मग यापूर्वी ते काढण्यावर कोणाचा दबाव होता? असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. त्यानंतर ते स्वत:हून शाहूवाडी पोलिसांत हजर झाले परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
संभाजीराजेंवर गुन्हा दाखल नाही
शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा मला अटक करा, या मागणीसाठी संभाजीराजे यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात चार तास ठाण मांडले होते. मात्र, पोलिस उपअधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, असे सांगितले.
तीन दिवसांची कोठडी
याप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ६० जणांवर गुन्हे दाखल केले. २१ जणांनी पोलिसांनी अटक करून शाहूवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.