कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

By विश्वास पाटील | Published: December 1, 2023 01:55 PM2023-12-01T13:55:20+5:302023-12-01T13:55:39+5:30

तीस एकरात होणार सुसज्ज हॉस्पिटल, मंत्री मुश्रीफ यांनी केले प्रयत्न

Administrative approval for 1100 bed hospital in Shenda Park Kolhapur | कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

कोल्हापूर, : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान; छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच सीपीआरमध्ये अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी ४४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे.

शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत. हॉस्पिटलमधील सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल -दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. इमारतींची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा- सुविधा आणि परिसर सुधारणांसह या कामांवर एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पाच इमारती ५८ कोटी निधीच्या खर्चातून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात हॉस्पिटल..

  • एकूण परिसर : ३० एकर
  • किती असतील बेड : ११००
  • न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
  • निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष व महिला वसतिगृह- क्षमता प्रत्येकी २५०
  • मुले व मुलींचे वसतिगृह- क्षमता प्रत्येकी १५०
  • परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३०


अत्याधुनिक उपचाराची सोय : मुश्रीफ

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. माझ्या जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही सर्वोच्च समाधानाची बाब आहे. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे कॅन्सरचे उपचारही कोल्हापुरातच मिळतील. पुण्या- मुंबईला जाऊन करावे लागणारे हृदय, यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यासारखे विशेषोपचारही रुग्णांना कोल्हापुरातच मिळतील.

Web Title: Administrative approval for 1100 bed hospital in Shenda Park Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.