निवडणुकीसाठी महामंडळावर प्रशासक नेमा
By Admin | Published: January 19, 2016 12:20 AM2016-01-19T00:20:40+5:302016-01-19T00:37:25+5:30
चित्रपट महामंडळ वाद : भ्रष्टाचाराच्या चौकशीची माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांची मागणी
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपल्याने महामंडळावर प्रशासक नेमून आगामी पंचवार्षिक निवडणुका त्यांच्यामार्फत घ्याव्यात, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात केल्याची माहिती महामंडळाचे माजी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जाधव म्हणाले, विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर व त्यांच्या कार्यकारिणीची मुदत १२ डिसेंबर २०१५ ला संपली आहे. तेव्हा त्यांच्या नियंत्रणाखाली महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक न घेता, ती महामंडळावर प्रशासक नेमून घ्यावी, तसेच माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह पुणे शाखा व्यवस्थापकांनी केलेल्या भ्रष्टाचाराचीही चौकशी प्रशासकाकडून व्हावी. विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी सर्वसाधारण सभेत मुंबई येथील महिला सभासदांवर हात उगारल्याचे खोटे व धादांत आरोप केले आहेत. त्याबद्दल त्यांनी कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिक व सभासदांची माफी मागावी. विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपलेली असल्यामुळे व त्यांच्यावर प्रतिसभेत अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. या कारणामुळे या कार्यकारिणीला आर्थिक व्यवहार करण्यास न्यायालयाने मनाई करावी, अशी मागणी धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयात केली आहे. याशिवाय विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी सर्वसाधारण सभेत काही वेगळे प्रश्न विचारले, तर गोंधळ घालण्याचा मुंबई येथील सभासदांना सूचना केली होती, असा आरोपही जाधव यांनी केला.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रमोद शिंदे, विजय शिंदे, रणजित जाधव, रवी गावडे, धनाजी यमकर, पी. वाय. कोळी, महेश देशपांडे, अरुण भोसले-चोपदार, शरद चव्हाण, किशोर सुतार, राजेंद्र माळकर, प्रसन्न घोडके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)