बहिरेवाडीच्या वारणा संस्थेवर प्रशासक
By Admin | Published: January 25, 2016 01:05 AM2016-01-25T01:05:00+5:302016-01-25T01:05:00+5:30
शेतकऱ्यांची अडवणूक भोवली : पदभार स्वीकारण्यास प्रशासकांची टाळाटाळ
कोल्हापूर : बहिरेवाडी-जाखले (ता. पन्हाळा) येथील वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमण्यात आले. संस्थेशी संबंधित तीन शेतकऱ्यांना पाणीपुरवठा न केल्याबद्दल साहाय्यक निबंधकांनी ही कारवाई केली असली तरी अद्याप राजकीय दबावामुळे प्रशासक म्हणून पदभार घेण्यास एस. व्ही. शिंदे यांच्यासह इतर सदस्य टाळाटाळ करीत असल्याची तक्रार संबंधित शेतकरी करीत आहेत.
वारणा पाणीपुरवठा संस्थेतून माणिक निकम, सागर चौगुले, आदी शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता; पण या शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांना ऊस घातल्याचे कारण पुढे करीत त्यांना दोन महिन्यांपासून पाणीच दिलेले नाही.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पन्हाळ्याचे साहाय्यक निबंधक सुजय येजरे यांच्याकडे तक्रारी केली. त्यांनी संबंधित संस्थाचालकांना कारणे दाखवा नोटिसा काढून खुलासा मागितला; पण संस्थेने साहाय्यक निबंधकांच्या नोटिसीला केराची टोपली दाखविली. त्यानंतर येजरे यांनी तुमचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमू नये, अशी नोटीस लागू केली; पण तिलाही संचालकांनी दाद दिली नाही.
अखेर ११ जानेवारी २०१६रोजी साहाय्यक निबंधक सुजय येजरे यांनी पाणीपुरवठा संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली असून, अध्यक्ष एस. व्ही. शिंदे, तर सदस्य म्हणून उपलेखापरीक्षक आर. डी. कुलकर्णी यांची नियुक्ती केली.
याविरोधात संस्थाचालकांनी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे अपील केले. त्यांनी साहाय्यक निबंधकांचे आदेश कायम ठेवत २ फेबु्रवारीला सुनावणी ठेवली आहे.
तरीही प्रशासक शिंदे यांनी पदभार स्वीकारू नये, यासाठी राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. २ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.