भोगावती कारखान्यावर अखेर प्रशासक

By Admin | Published: March 25, 2016 12:40 AM2016-03-25T00:40:43+5:302016-03-25T00:40:54+5:30

सूत्रे स्वीकारली : त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ

Administrator at the end of the factory | भोगावती कारखान्यावर अखेर प्रशासक

भोगावती कारखान्यावर अखेर प्रशासक

googlenewsNext

भोगावती : येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुुदत १५ जून २०१५ ला संपल्याच्या कारणावरून प्रशासक नियुक्तीची कारवाई करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साखर सहसंचालक यांच्याकडून तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. भोगावती कारखान्यावर झालेल्या या पहिल्याच प्रशासकीय कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राधानगरी आणि करवीर तालुक्यातील ५२ गावचे कार्यक्षेत्र असणारा भोगावती साखर कारखाना या ना त्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. सभासद वाढीसह अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट

असताना २०१० मध्ये सत्तेवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि जनता दलाच्या सत्ताधारी गटाला घरचा रस्ता बघावा लागला. पांडुरंग तुकाराम माळी (वाशी, ता. करवीर) यांच्यासह ९३ जणांनी ४ जानेवारीला साखर आयुक्त आणि साखर संचालक यांना निवेदन दिले होते. भोगावती कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत १५ जूनला संपली असून, त्यांना मुदतवाढ नसताना सत्तेवर राहू दिले जाऊ नये आणि महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले जाऊ नयेत. मात्र, कारवाई होत नाही म्हटल्यावर दाद मागितली होती. त्यावर दोन्ही बाजंूचे म्हणणे घेतल्यानंतर साखर सहसंचालक यांना प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले, त्यानुसार साखर सहसंचालक सचिन रावळ यांनी सहकार कलम ७७ (अ)नुसार कारवाई केली आहे.
प्रशासक संभाजी निकम, सुनील धायगुडे आणि आर. बी. वाघ यांनी बुधवारी साडेअकरा वाजता कारखान्यावर येऊन आदेश लागू केला आणि त्याचवेळी तत्काळ कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, उपाध्यक्ष केरबा भाऊ पाटील आणि संचालक मंडळाला कार्यभार सोडण्याचे कळविले. त्यावर चार दिवस सुट्या आहेत त्यानंतर आम्ही कार्यभार सोडतो, असे संचालक मंडळाने सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रशासक मंडळाने त्यास नकार दिला व बुधवार (दि. २३)पासूनच प्रशासकीय कारभार सुरू केला. कारखान्यावर प्रशासक आल्याची बातमी सोशल मीडियावरून पसरली. त्यावरून नेत्यांपासून संचालकांपर्यंत शेरेबाजी सुरू झाली. शिमग्यादिवशीच कारवाई झाल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याची शाब्दिक धुलाई होत होती.


अनलिमिटेड कालावधी
प्रशासकीय कालावधी किती याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत; पण जोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरू होत नाही अगर न्यायालयाचे पुढील आदेश होत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रशासकीय कामकाज पाहू, असे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष संभाजी निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रशासक मंडळाने दुपारी साडेबारा वाजता कारभार हाती घेताच कामाला सुरुवात केली. कारखान्याचे गेस्ट हाऊस तत्काळ बंद करून कुलपे ठोकली, तर कॅश विभागातील आवश्यक-अनावश्यक व्हौचर तपासून निर्णय घेतले जाऊ लागले.

असे आहे प्रशासक मंडळ
प्रशासकीय मंडळात कोल्हापूर शहरचे सहकारी संस्था उपनिबंधक संभाजी निकम यांची अध्यक्ष म्हणून, तर शिरोळ येथील सह. संस्था सहा. निबंधक सुनील धायगुडे आणि सहकारी संस्था (साखर) द्वितीय विशेष लेखापरीक्षक वर्ग १ चे आर. बी. वाघ यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


सर्व कामगार हजर
कारखान्यावर प्रशासक आल्याची बातमी अवघ्या अर्ध्या तासात सर्वत्र पसरली. यावेळी कारखान्यात हजेरी दाखवून साहेबांच्या वर्दीत असणाऱ्या दांडीबहाद्दूर कर्मचारी अवघ्या पंधरा मिनिटांत कारखान्यात कामावर हजर झाले होते. त्यामुळे कोणत्या विभागात किती कामगार आणि किती भरती केली आहे हे सहज समजत होते.


भोगावती कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या कारणावरून प्रशासक आले आहे. आम्ही कोणताही गैरकारभार केलेला नाही. याबाबत संचालक आणि प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असून, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेदेखील दाद मागू.
- धैर्यशील पाटील, अध्यक्ष, भोगावती साखर कारखाना.


‘भोगावती’वर प्रशासक येण्याला सरकारी यंत्रणा मुख्य कारणीभूत आहे. सभासद वाढीची चौकशी जलदगतीने होऊन निर्णय झाला असता तर निवडणूक कार्यक्रम लागला असता. मात्र, संबंधित यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे दिवस वाढत जाऊन मतदार यादी निश्चित व्हायला वेळ लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाची वेळ आली आहे.
- संपतराव पवार-पाटील,
माजी आमदार

Web Title: Administrator at the end of the factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.