प्रशासक हे राष्ट्रवादीचेच पाप
By admin | Published: June 27, 2015 12:08 AM2015-06-27T00:08:29+5:302015-06-27T00:14:32+5:30
संजय घाटगे : व्हन्नाळी येथे बाजार समिती निवडणूक प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा
साके : बाजार समितीच्या जागा आणि बोळ विकून खाणारेच या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिल्हा बँक आणि बाजार समितीवर आलेला प्रशासक हे राष्ट्रवादीचेच पाप आहे, असा थेट हल्लाबोल माजी आमदार संजय घाटगे यांनी केला. शिव-शाहू आघाडीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते व्हन्नाळी (ता. कागल) येथे बाजार समिती निवडणुकीसंदर्भात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती श्रीकांत लोहार होते.
घाटगे म्हणाले, ‘स्वत:च्या स्वार्थापलीकडे मुश्रीफ यांना काहीच दिसत नाही. आमच्या राजकीय जीवनात आम्ही जे बोललो त्याच्याशी प्रामाणिक राहत आलो आहोत. मुश्रीफ यांच्यासारखे सतराजणांना झुलवत ठेवले नाही. त्यामुळे संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखालील शिव-शाहू आघाडीच या निवडणुकीत मुश्रीफांच्या खोटारडेपणाचे पानिपत करेल. त्यांना खरंच बँक सुधारायची असेल, तर स्वत:चे आणि त्यांच्या बगलबच्चांचे कर्तृत्व आणि चारित्र्य सुधारावे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. बाजार मालाला रास्त भाव मिळावा आणि शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबावी, या उद्देशाने बाजार समितीची स्थापना झाली असताना दुर्दैवाने कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे गट-तट न बघता अशा लुटारू टोळीला मज्जाव करा.
‘गोकुळ’चे संचालक अमरिश घाटगे म्हणाले, आतापर्यंत सत्तेच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या बळावर आपण लढत आलो आहोत. आता संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य वंचितांना न्याय मिळवून देण्याचे काम करू, तर योजनेचे अध्यक्ष धनराज घाटगे यांनी गट-तट न बघता खऱ्याखुऱ्या लाभार्थ्याला वेळच्यावेळी न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सदस्य ए. वाय. पाटील, अशोक दाभोळे, आर. के. कुंभार, बी. आर, कांबळे, तानाजी हेगडे, एम. बी. पाटील, शामराव पोवार, मधुकर लोहार, आदी उपस्थित होते.