गायकवाड कारखान्यावर प्रशासक शक्य
By admin | Published: April 15, 2017 07:19 PM2017-04-15T19:19:21+5:302017-04-15T19:19:21+5:30
उमेदवारी अर्ज अवैध प्रकरण : मंगळवारच्या सुनावणीकडे नजरा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १५ : सोनवडे-बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेत अपात्र ठरविलेल्या २७ जणांच्या अर्जावर मंगळवारी (दि. १८) सुनावणी होणार आहे.
या निर्णयावर सत्तारूढ गटाचे भवितव्य अवलंबून असून हे सर्वच अर्ज अवैध ठरविले तर सहकार कलम ७३ नुसार कारखान्यांवर प्रशासक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गायकवाड साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून छाननी मध्ये तब्बल २७ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संभाजी निकम यांनी अवैध ठरविले. यामध्ये कारखान्याचे संस्थापक मानसिंगराव गायकवाड यांच्यासह चौदा संचालकांचा समावेश आहे.
उदयसिंगराव गायकवाड ऊस तोडणी व वाहतूक संस्था जिल्हा बॅँकेची थकबाकीदार आहे. या संस्थेचे संबधित पदाधिकारी असल्याने त्यांना कारखान्याच्या निवडणूक लढविता येणार नसल्याचे निकम यांनी सांगितले. त्याबरोबर अपुरे शेअर्स वर्गणी व अपुरा ऊस पुरवठा न केल्याने स्वप्नील शंकर पाटील यांच्यासह तेरा जणांचे अर्ज अवैध ठरविले.
या विरोधात संबधितांनी प्रादेशिक साखर सहसंचालक सचीन रावल यांच्याकडे अपील दाखल केले आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी ३८ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २७ अर्ज अवैध ठरविले आहेत. जर मंगळवारच्या सुनावणीत सहसंचालकांनी या २७ जणांना अवैध ठरविले तर या अडचणीत भर पडणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम-
माघार-५ ते १९ एप्रिल
मतदान-३० एप्रिल
मतमोजणी-२ मे रोजी