महागावच्या राजा शिवछत्रपती महाविद्यालयावर प्रशासक
By Admin | Published: August 11, 2016 12:20 AM2016-08-11T00:20:08+5:302016-08-11T00:32:22+5:30
अजय साळी यांची नियुक्ती : उच्चशिक्षण सहसंचालकांचा आदेश
कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांची महागाव (ता. गडहिंग्लज) येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रशासकपदी शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी समितीने दिलेल्या अहवालाची दखल घेऊन उच्चशिक्षण सहसंचालक
डॉ. धनराज माने यांनी संबंधित महाविद्यालयावरील प्रशासकपदाचा आदेश दिला. या आदेशानुसार डॉ. साळी यांनी प्रशासकपदाचा कार्यभार सोमवारी (दि. ८) स्वीकारला आहे.
या प्रशासकपदाच्या नियुक्तीबाबत डॉ. साळी यांनी सांगितले की, संबंधित महाविद्यालय सेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्थेतर्फे संचलित आहे. महाविद्यालयाच्या कारभाराबाबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या शुल्काच्या पावत्यांमधील घोळ, सन १९९५-९६ पासून महाविद्यालयाला अनुदान मिळत असूनही पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव, प्राध्यापकांच्या वेतनामधील काही रकमा राखून ठेवणे, आदींचा समावेश होता. या विविध तक्रारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यावर विद्यापीठाने चौकशी समितीची नियुक्ती केली.
या समितीचा अहवाल सहसंचालकांचा अभिप्राय घेऊन शासनाला सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करण्यापूर्वी महाविद्यालयाला त्यांच्या त्रुटी, चुकांची दुरुस्ती करण्यासाठी वेळ देण्यात आला होता; पण याबाबत काहीच सकारात्मक कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित अहवालाची दखल घेऊन शासनाने महाविद्यालयावर प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली. याबाबतचे उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. माने यांनी ४ आॅगस्टला पत्र पाठविले. या पत्राद्वारे त्यांच्या आदेशानुसार सोमवारी प्रशासकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवास जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाने महाविद्यालयावर प्रशासक नेमल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
‘नॅक’ मूल्यांकनाला प्राधान्य
महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन करून घेण्याला माझे प्राधान्य राहील, असे डॉ. साळी यांनी सांगितले. ते म्हणाले, तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून शासनाने माझी नियुक्ती केली आहे.
महाविद्यालयातील अडचणी सोडविण्यासह विकास साधण्यासाठी पहिल्यांदा महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करणार आहे.