कौतुकास्पद! फोटो काढताना विसरलेली महिलेची दागिन्यांची पर्स नऊ वर्षीय मुलीकडून परत

By उद्धव गोडसे | Published: May 20, 2024 03:22 PM2024-05-20T15:22:13+5:302024-05-20T15:23:41+5:30

पर्समध्ये सात तोळे दागिने, २७ हजारांची रोकड, आंबा घाटातील घटना, सृष्टीच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

Admirable Nine-year-old girl returns woman jewelry purse she forgot while taking photos | कौतुकास्पद! फोटो काढताना विसरलेली महिलेची दागिन्यांची पर्स नऊ वर्षीय मुलीकडून परत

कौतुकास्पद! फोटो काढताना विसरलेली महिलेची दागिन्यांची पर्स नऊ वर्षीय मुलीकडून परत

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: मूळची हळदी (ता. कागल) येथील आणि सध्या कोल्हापुरात सुर्वेनगर येथे राहणारी सृष्टी प्रशांत मगदूम (वय ९) ही रविवारी (दि. १९) कुटुंबीयांसह आंबा घाट येथे फिरण्यासाठी गेली असता, तिला पर्स सापडली. पर्समधील दागिने आणि रोकड ज्याची आहे त्याला परत करावी, यासाठी तिने वडिलांकडे आग्रह धरला. वडिलांनी एका पोलिस मित्रामार्फत करवीर उपअधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून नजमा दिलदार आत्तार (वय ३५, रा. पंचशीलनगर, सांगली) यांना सोमवारी (दि. २०) सकाळी सात तोळे दागिने आणि २७ हजारांच्या रोकडसह सर्व मुद्देमालाची पर्स परत केली. आंबा घाटात फोटो काढताना आत्तार यांची पर्स विसरली होती.

सांगली येथील नजमा आत्तार या रविवारी दुपारी पर्यटनासाठी कुटुंबीयांसह आंबा घाट येथे गेल्या होत्या. एका वळणावर फोटो काढताना त्यांनी जवळची पर्स दगडावर ठेवली. फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स विसरून कारमध्ये बसल्या. काही वेळात त्याच वळणावर सुर्वेनगर येथील प्रशांत मगदूम आणि सुशांत मगदूम हे कुटुंबीयांसह पोहोचले. तिथे सृष्टी मगदूम या मुलीला पर्स सापडली. पर्समध्ये दागिने आणि रोकड असल्याचे लक्षात येताच त्यांनी पर्सच्या मालकीणीचा आजूबाजूला शोध घेतला. दागिन्यांची पर्स ज्याची आहे, त्याला मिळावी असा सृष्टीने आग्रह धरला. पर्सच्या मालकीणीचा शोध घेण्यासाठी सृष्टीच्या वडिलांनी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील या मित्राला फोन केला. त्याने करवीर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल योगेश कांबळे यांना घटनेची माहिती दिली. कांबळे यांनी याची माहिती उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना दिली.

क्षीरसागर यांनी तातडीने अधिका-यांच्या जिल्ह्यातील ग्रुपवर माहिती कळवली. दागिन्यांची पर्स विसरलेल्या नजमा आत्तार या फिर्याद देण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूवाडी पोलिस ठाण्यात पोहोचताच संबंधित पर्स सुर्वेनगर येथील मुलीला सापडल्याचे समजले. दरम्यान, उपअधीक्षक क्षीरसागर यांनी आत्तार आणि मगदूम कुटुंबीयांना त्यांच्या कार्यालयात बोलवून सर्व मुद्देमालाची पर्स परत केली. उपअधीक्षक क्षीरसागर यांनी सृष्टीच्या आणि मगदूम कुटुंबाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सृष्टीचे अभिनंदन केले. आत्ता कुटुंबीयांनीही रोख रक्कम देऊन सृष्टीचे कौतुक केले.

Web Title: Admirable Nine-year-old girl returns woman jewelry purse she forgot while taking photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.