कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:27 PM2019-07-13T16:27:20+5:302019-07-13T16:31:04+5:30
चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.
कोल्हापूर : चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.
एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या चित्रकला, शिल्पकलेच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. या कलेच्या माध्यमातून अॅनिमेशन, डिझायनिंग, आर्किटेक्ट, डिजिटायझेशन अशा विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या कलांचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. ‘काही येत नाही तर चित्रकलेकडे जा,’ ही मानसिकता बदलून आता अगदी ९७ व ९३ टक्के गुण मिळालेले विद्यार्थीदेखील कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत.
कोल्हापूर शहरात दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट, रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय व कलामंदिर ही तीन कला महाविद्यालये कार्यरत आहेत. या तीनही कला महाविद्यालयांमध्ये फौंडेशन, अप्लाइड आर्टच्या वर्गासाठी १०० हून अधिक अर्ज आले आहेत. या वर्गाची प्रवेश क्षमता ३० आहे. मेरिट आणि आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
दरवर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र शासनमान्यतेच्या नियमानुसार विद्यार्थिसंख्येवर मर्यादा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळत नाही. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा वेटिंग लिस्टवर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी असते; त्यामुळे या कला महाविद्यालयांनी शासनाकडे विद्यार्थिसंख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.
कला महाविद्यालयांमधील प्रवेश असे -
- दळवीज आर्टस
फौंडेशन : ४० विद्यार्थी
फाईन आर्ट, इलिमेंटरी, इंटरमीजिएट, अॅडव्हान्स, डिप्लोमा : प्रत्येकी २० विद्यार्थी
- कलानिकेतन
फौंडेशन : ३० विद्यार्थी
अप्लाईड आर्ट : ३० विद्यार्थी
- कलामंदिर
शिल्पकला : १५ विद्यार्थी
चित्रकला : ३० विद्यार्थी