निगेटिव्ह अहवाल असेल तरच जिल्ह्यात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:35+5:302021-06-02T04:18:35+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून त्याअंतर्गत ...
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून त्याअंतर्गत आरटीपीसीआर किंवा अँटिजन तपासणी अहवाल निगेटिव्ह व अत्यावश्यक कारण असलेल्या नागरिकांनाच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार आहे, असा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. हा अहवाल नसल्यास नाक्यालगत अँटिजन तपासणी केली जाईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत बैठक झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी व अधिकारी उपस्थित होते.
तपासणीस विरोध केल्यास साहित्य विक्रीवर बंदी
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, घर लहान असेल तर रुग्णामुळे कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करा. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील दुकानदार व कामगार, औद्योगिक कामगार, मजूर यांची अँटिजन तपासणी करून घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या साहित्य विक्रीला बंदी घाला.
रुग्णसंख्या अधिक असलेल्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी सोयी सुविधा निर्माण करायला हव्यात. हेल्पलाइनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तसेच व्हेंटिलेटरचे बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सेवा सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल.
---
-रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करा
नेमून दिलेल्या वेळेशिवाय दुकान सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई
फोटो नं ०१०५२०२१-कोल-कलेक्टर बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आमदार चंद्रकांत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आमदार ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.
--