वैद्यकीय महाविद्यालयाच्या वाढीव जागांवर पुढील वर्षी प्रवेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:09 AM2019-09-10T11:09:40+5:302019-09-10T11:12:54+5:30
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिलने वाढवून दिलेल्या ५० जागांवर प्रवेशाची कार्यवाही पुढील वर्षांपासून होणार असल्याचे दिसत आहे. या जागांवरील प्रवेशाबाबत महाविद्यालयाला अद्याप वैद्यकीय संचालनालय अथवा सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून (सीईटी सेल) निर्देश प्राप्त झालेले नाहीत.
कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मेडिकल कौन्सिलने वाढवून दिलेल्या ५० जागांवर प्रवेशाची कार्यवाही पुढील वर्षांपासून होणार असल्याचे दिसत आहे. या जागांवरील प्रवेशाबाबत महाविद्यालयाला अद्याप वैद्यकीय संचालनालय अथवा सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून (सीईटी सेल) निर्देश प्राप्त झालेले नाहीत.
याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले की, त्रुटींची पूर्तता केली नसल्याने या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कमी केलेल्या ५० जागा इंडियन मेडिकल कौन्सिलने कायम ठेवल्या आहेत. कौन्सिलच्या निर्णयामुळे महाविद्यालयातील जागांची संख्या पूर्वीप्रमाणे १५० इतकी झाली आहे.
कायम केलेल्या ५० जागांवर यंदा की पुढीलवर्षी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावयाचा, याबाबत सोमवारी सकाळी वैद्यकीय संचालनालय आणि सीईटी सेलकडे विचारणा केली. त्यासह प्रवेशाच्या अनुषंगाने काही मुद्द्यांवर चर्चा केली.
मात्र, सायंकाळपर्यंत सीईटी सेलकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. तिसऱ्या फेरीची मुदत गुरुवारी (दि. १२) पूर्ण होणार आहे. त्यापूर्वी निर्देश आले, तर यंदा अन्यथा पुढील वर्षी या वाढीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवावी लागणार आहे.