आयुष अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशच धोक्यात; पाचपट फीसाठी संस्थांची आडकाठी
By संदीप आडनाईक | Published: October 10, 2023 07:04 PM2023-10-10T19:04:13+5:302023-10-10T19:04:31+5:30
संदीप आडनाईक कोल्हापूर : आयुष (आयर्वेद, होमिओपॅथी युनान) अभ्यासक्रमांच्या राज्यस्तरावरील जागांसाठी दुसऱ्या कॅप राउंडसाठी प्रवेश निश्चितीचा आज, मंगळवारचा दिवस ...
संदीप आडनाईक
कोल्हापूर : आयुष (आयर्वेद, होमिओपॅथी युनान) अभ्यासक्रमांच्या राज्यस्तरावरील जागांसाठी दुसऱ्या कॅप राउंडसाठी प्रवेश निश्चितीचा आज, मंगळवारचा दिवस अखेरचा आहे. यात इन्स्टिट्यूट कोट्यामधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यामार्फत घेतलेल्या नीट २०२३ परीक्षेच्या माध्यमातून वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो. आता ''आयुष''साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या राउंडमध्ये इन्स्टिट्यूट कोट्यातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना प्रवेश घेण्यासाठी शुल्क नियंत्रण समितीने मूळ फीच्या तीन रक्कम घेऊन प्रवेश द्यावे असा शासन आदेश काढला आहे, पण कांही संस्था विद्यार्थ्यांकडून पाचपट फीची मागणी करत प्रवेश देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.
आज, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर त्यांना प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडावे लागणार आहे. मग पुन्हा त्यांना नव्याने ६००० रुपये भरून नोंदणी करावी लागेल आणि पुन्हा याच प्रक्रियेतून जावे लागणार आहे. शिवाय पुढील राउंडमध्ये सीट मिळेलच याची खात्री नाही, संस्था चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थी व पालक दुहेरी पेचात अडकले आहेत. त्यांच्यासाठी प्रवेश देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
कर्नाटकसारखी व्यवस्था राबवा
याच प्रवेश प्रक्रियेसाठी कर्नाटकमध्ये स्वतः शासन शुल्क भरून घेते आणि प्रवेश जाहीर करते. तशीच व्यवस्था महाराष्ट्रात राबवणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय प्रवेश समुपदेशक अशोक शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
पाचपट फीसाठीच संस्थांची आडकाठी
या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या राउंडची प्रवेश प्रक्रिया आज, मंगळवारी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. तोपर्यंत तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही आणि शुल्क समितीच्या आथॅरिटीने तीनपट फी भरण्याची प्रवेश देण्याची सक्ती केली नाही तर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतूनच बाहेर पडावे लागणार आहे. खरंतर कॉलेजने या राउंडमध्ये प्रवेश दिला नाही तर त्या कॉलेजला दोन कोटी रुपयांचा दंड तर आहेच शिवाय प्रवेश देणे बंधनकारक असतानाही या कॉलेजची अरेरावी सुरू आहे.
पाचपट रक्कम भरून पालक प्रवेश घेणारच याची जाणीव असल्याने कॉलेजकडून आडकाठी केली जात आहे. याची शासन व शुल्क समितीने त्वरित दखल घेऊन खोटे उत्तर देणाऱ्या कॉलेज विरुद्ध कडक कारवाईसुद्धा केली पाहिजे. - अशोक शेट्टी, माजी प्राचार्य, समुपदेशक, वैद्यकीय प्रवेश