अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:19 AM2020-12-10T11:19:36+5:302020-12-10T11:21:56+5:30
CoronaVirusUnlock, College, Kolhapurnews कोरोना आणि एसईबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. त्यामुळे या अभ्यासक्रमांची महाविद्यालये, सुविधा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचा परिसर गर्दीने फुलला.
कोल्हापूर : कोरोना आणि एसईबीसी आरक्षणावरील स्थगितीमुळे लांबणीवर पडलेली अभियांत्रिकी, फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली. त्यामुळे या अभ्यासक्रमांची महाविद्यालये, सुविधा केंद्र असलेल्या महाविद्यालयांचा परिसर गर्दीने फुलला.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दि. १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. कागदपत्र पडताळणीची मुदत दि. १६ डिसेंबरपर्यंत आहे.
त्यामुळे नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, केआयटी कॉलेज, भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आदी महाविद्यालयांमध्ये बुधवारी गर्दी केली.
अनेक विद्यार्थी हे पालकांसमवेत आले होते. अर्जाची नोंदणी करण्यासह पुढील प्रक्रियेची माहिती विद्यार्थी बारकाईने घेत होते. भारती विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अर्ज भरण्याची सुविधा
तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी (दि. ७) ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. गुणवत्ता यादीत काही दुरुस्ती, त्रुटी असल्यास त्याबाबतची पूर्तता करून शनिवारी (दि. १२) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विकल्प अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यावेळी विद्यार्थ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती प्रवेश समितीचे समन्वयक महादेव कागवाडे यांनी दिली.