‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:18 AM2021-07-20T04:18:24+5:302021-07-20T04:18:24+5:30
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार ‘आयटीआय’मधील एकूण ३१ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी शनिवार (दि. १६)पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली ...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार ‘आयटीआय’मधील एकूण ३१ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी शनिवार (दि. १६)पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जातील माहिती गोठविण्यात येईल. त्यानंतर या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सहा प्रवेश फेऱ्या होणार आहेत. कळंबा रोड येथील शासकीय आयटीआयमध्ये प्रवेशाबाबत मार्गदर्शन कक्ष सकाळी दहा ते अकरा यावेळेत सुरू असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. दुबार अर्ज केल्यास उमेदवार प्रवेश प्रक्रियेमध्ये अपात्र ठरला जाईल. गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांकडे सर्व मूळ प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ९० टक्के आणि जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रवेशाबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती आयटीआयचे प्राचार्य आर. एस. मुंडासे यांनी दिली. पॉलिटेक्निकमधील विविध पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया दि. ३० जूनपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्ज करण्याची गती वाढली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २३ जुलैपर्यंत आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाचे नोडल ऑफिसर आणि शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले.
चौकट
पॉलिटेक्निकसाठी आतापर्यंत १७४० अर्ज
जिल्ह्यातील २० पॉलिटेक्निकमध्ये एकूण ६५१७ जागा आहेत. आतापर्यंत एकूण १७४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ७०० जणांनी अर्ज निश्चित केले आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्याने अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढू लागली असल्याचे प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले.