बेवारस वृद्धाला केले रुग्णालयात दाखल
By admin | Published: September 25, 2016 01:21 AM2016-09-25T01:21:30+5:302016-09-25T01:21:30+5:30
राजारामपुरीतील मंडईसमोर प्रचीती
कोल्हापूर : न राहिला जिव्हाळा, न राहिली आपुलकी, बदलला माणूस, बदलली माणुसकी अशी स्थिती सध्या पाहावयास मिळत असताना इंटरनेटने जग जवळ आले आणि ‘माणुसकी हरवली’ आहे, असे काहीसे चित्र दिसते. मात्र, आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रचीती शनिवारी राजारामपुरीतील मंडईसमोर आला.
शहरात दोन-तीन दिवसांपासून पाउस सुरु आहे. राजारामपुरीतील भाजी मंडईसमोर एका दुकानाच्या दारात हतबल बेवारस वृद्ध चार दिवस एकाच जागी हालचाल न करता बसलेली होती. येथे भाजी खरेदीसाठी अनेकजण येतात. मात्र, कोणालाच साधी विचारपूस करण्याइतपतही वेळ नव्हता. पावसामध्ये हतबल झालेला हा बेवारस माणूस चार दिवसांपासून एकाच जागी मरणासन्न अवस्थेत बसल्याचे पाहून येथील दुकानदार व युवकांना मायेचा पाझर फुटला व त्यांनी पुढाकार घेतला.
पावसात भिजल्याने या वृद्धाच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. माश्या घोंघावत होत्या. अशा अवस्थेतसुद्धा येथील दुकानदार नरसिंह साळवी, राजू सांगावकर, विजय सावंत आणि गणेश वडर यांनी वृद्धाची विचारपूस करून, त्याच्या अंगावर पांघरण्यासाठी चादर दिली, त्यास खाण्यास दिले. खायला मिळाल्याने, अंगावर ऊबदार चादर मिळाल्याने त्या वृद्धाला थोडी तरतरी आली. मात्र, तो काहीच बोलत नव्हता.
अखेर त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्धार करून, पोलिसांच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये नेऊन दाखल केले. या युवकांनी आजही माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला.
असा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतो; पण तेव्हाही माणसांची गरज ही लागणारच आहे. त्यामुळे अशा प्रत्येक गरजवंताला समाजातील माणसांनी मदत केली पाहिजे. एखाद्याचा जीव वाचविणे शक्य असेल तर त्यासाठी समाजातील व्यक्तींचा पुढाकार महत्त्वाचा आहे.
- नरसिंह साळवी