गणेशोत्सव वर्गणीतून पूरग्रस्त गाव, कुटुंबे दत्तक घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:04+5:302021-08-28T04:28:04+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरचा गणेशोत्सव देशभरात सामाजिक संदेश देणारा म्हणून पाहिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुका, गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी घातली ...
कोल्हापूर : कोल्हापूरचा गणेशोत्सव देशभरात सामाजिक संदेश देणारा म्हणून पाहिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणुका, गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी घातली आहे. त्यामुळे मंडळांनी लोक वर्गणीतून लसीकरण किंवा पूरग्रस्त कुटुंबीयांची पडलेली घरे उभी करू देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शुक्रवारी केले.
पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले की, कोल्हापूरचा गणेशोत्सव पाहण्यासाठी पुणे, मुंबईसह कर्नाटक, गोवा, आदी भागातून लोक येतात. मंडळेही रात्रंदिवस कष्ट करून नाविन्य देखावे, आकर्षक आरास करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. मंडळांनीही त्या आदेशाचे पालन करून उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. यंदा आगमन व विसर्जन मिरवणुकीवर बंदी घातली आहे. मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टम वापरता येणार नाहीत. मंडळांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. वर्गणीसाठी सक्ती करू नये. मिळालेल्या वर्गणीतून गरजूंसाठी लसीकरण मोहीम राबवावी. महापुराने कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्त व पुरात पडलेल्या कुटुंबीयांची घरे पुन्हा उभी करून द्यावीत, अशी सूचना मंडळाच्या बैठकीत केली आहे. कोल्हापूरची मंडळे या आवाहनास प्रतिसाद देतात, असा अनुभव माझा आहे. त्यामुळे यंदाही मंडळांनी चांगले उपक्रम राबवून पुन्हा एकदा कोल्हापूरचा डंका देशभर चांगला कसा होईल, याचे पालन करावे.
ढोलताशांसह बेंजोवादकांची स्पर्धा
गेल्या वर्षीपासून मिरवणुका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे ढोलताशा, बेंजो , बॅण्ड वादकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकरिता प्रायोजक मिळवून त्यांच्याकरिता स्पर्धा भरून त्यातून मानधन देण्याचा प्रयत्न पोलीस दल करेल.
साऊंड सिस्टम जप्त होणार
पोलिसांनी घालून दिलेल्या नियमानुसार मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टमचा वापर करता येणार नाही. मिरवणुका काढणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल होतील. याशिवाय ती साऊंड सिस्टमही जप्त केली जाईल.
तडीपारीच्या नोटीसा
शहरासह जिल्ह्यातील ५५ गुंडांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तडीपारीच्या नोटीसा दिल्या जाणार आहेत. त्याचे पालन त्यांनी करावे, अन्यथा मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिला.