‘अवनि’ने घेतले बाळ-बाळंतिणीला दत्तक
By admin | Published: December 4, 2015 12:21 AM2015-12-04T00:21:33+5:302015-12-04T00:22:29+5:30
भवानी मंडपात प्रसूती : सीपीआरमध्ये भेट घेऊन साहित्य भेट
कोल्हापूर : सासर व माहेरच्या लोकांनी बेदखल केलेल्या अर्चना सुरेश आडी (वय ३१) या गर्भवती महिलेची बुधवारी भवानी मंडपामध्ये उघड्यावरच प्रसूती झाली. या निराधार महिलेला गुरुवारी ‘अवनि’ सामाजिक संस्थेने आधार देत
‘बाळ-बाळंतिणी’ला दत्तक घेतले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले व सहकाऱ्यांनी सीपीआर रुग्णालयात भेट घेऊन तिला व बाळाला उपयोगी साहित्य भेट दिले.
अर्चना आडी यांचे पाच वर्षांपूर्वी संकेश्वर (जि. बेळगाव) येथील सुरेश आडी यांच्याशी लग्न झाले. त्यांचे माहेर व्यंकटेशनगर, शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील आहे. त्या आठ महिन्यांच्या गरोदर असताना पतीने त्यांना महिन्याभरापूर्वी घराबाहेर काढले. त्यानंतर त्या शिरोली पुलाची येथे माहेरी भावाकडे आल्या; परंतु या ठिकाणी जेमतेम दहा ते बारा दिवस राहिल्या. त्या ठिकाणीही त्यांना येथे राहू नकोस, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्या भटकत-भटकत भवानी मंडपात आल्या. मंगळवारी मध्यरात्री भवानी मंडपातच त्यांची प्रसूती झाली.
गुरुवारी दुपारी अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्यासह पुष्पा पठारे, जयश्री कांबळे, फ्रान्सिस डिसोझा, कॉट पसोरा, आदींनी सीपीआर रुग्णालयात जाऊन अर्चना व तिच्या बाळाची भेट घेतली. तिची विचारपूस करून आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर देत ब्लँकेट, चादर, बाळाचे कपडे, खाद्य पदार्थ, साड्या हे साहित्य तिला दिले. आम्ही तुला व बाळाला दत्तक घ्यायला तयार असल्याचे तिला सांगितले. यावर मी माहेरी किंवा सासरी जाणार नाही, तुमच्यासोबत येईन असे ‘अवनि’च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे चार दिवसांनंतर डिस्चार्ज मिळाल्यावर ‘बाळ-बाळंतिणी’ला अवनि संस्था नेणार आहे.
यावेळी अनुराधा भोसले यांनी डॉक्टरांशी चर्चा करून माय-लेकरांच्या तब्येतीची माहिती घेतली. त्यांच्याकडून दोघांचीही तब्येत चांगली असल्याचे सांगण्यात आले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद उपस्थित होते.