उच्च शिक्षण सहसंचालकांकडून महाविद्यालयांची पटपडताळणी

By admin | Published: October 13, 2015 10:48 PM2015-10-13T22:48:42+5:302015-10-13T23:49:50+5:30

प्राचार्य, प्राध्यापकांची धावपळ : कार्यवाही शनिवारपर्यंत चालणार

Adoption of colleges from higher education co-operative colleges | उच्च शिक्षण सहसंचालकांकडून महाविद्यालयांची पटपडताळणी

उच्च शिक्षण सहसंचालकांकडून महाविद्यालयांची पटपडताळणी

Next

कोल्हापूर : उच्च शिक्षण विभागाने वरिष्ठ महाविद्यालयांची पटपडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापकांसह व्यवस्थापनाची धावपळ सुरू आहे. विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाने मंगळवारअखेर ७० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली आहे.विविध महाविद्यालयांमध्ये पटावर तसेच प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थिसंख्येत तफावत असल्याचे शासनाच्या शिक्षणविभागाच्या लक्षात आले आहे. त्याबाबत पटपडताळणी करण्याचा निर्णय घेऊन उच्च शिक्षण विभागाला शासनाने सूचना दिली. त्यानुसार सोमवार (दि. १२)पासून कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पटपडताळणी सुरू केली. यात अचानक महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थी व पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी सहसंचालक कार्यालय, राजाराम महाविद्यालय, बी. टी. कॉलेज, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर, ईबीसी होस्टेल, बुधगाव आणि कोल्हापूरमधील सुमारे ३५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पथके तयार केली आहेत. संबंधित पथके अचानकपणे महाविद्यालयांना भेटी देऊन पटपडताळणी करीत आहेत. त्यामुळे प्राचार्य, प्राध्यापकांची धावपळ उडाली आहे. आतापर्यंत पाहणी करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये बहुतांश ठिकाणी विद्यार्थिसंख्या आहे. मात्र, ग्रामीण भागातील महाविद्यालयांत काही ठिकाणी पट व वास्तव विद्यार्थिसंख्येत तफावत असल्याचे समजते. (प्रतिनिधी)

सुट्या रद्द : व्यवस्थापनाचा निर्णय
या पटपडताळणीमुळे वरिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापनाने येत्या आठवड्याभरापर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.
पथकांकडून अचानकपणे पाहणी केली जात आहे. त्यामुळे विद्यार्थिसंख्या, तसेच अन्य सुविधांबाबतची तयारी करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाने सुट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.


महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्षात किती विद्यार्थिसंख्या आहे, ते जाणून घेण्यासाठी पटपडताळणी केली जात आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण १३३ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे. पटपडताळणीची प्रक्रिया शनिवार (दि. १७)पर्यंत चालणार आहे. त्याचा एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयाला १० नोव्हेंबरपर्यंत सादर केला जाणार आहे.
- डॉ. अजय साळी,
विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक.

Web Title: Adoption of colleges from higher education co-operative colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.