टाकाऊ लाकडातून साकारली गणरायाची मनमोहक रूपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:19+5:302021-09-13T04:24:19+5:30
कला शिक्षक, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांच्या अप्रतिम कलाकृती अनिल पाटील सरुड : मलकापूर (ता. शाहूवाडी ) येथील न्यू ...
कला शिक्षक, काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांच्या अप्रतिम कलाकृती
अनिल पाटील
सरुड : मलकापूर (ता. शाहूवाडी ) येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स या शाळेतील कलाशिक्षक आणि चिंचोली (ता. शिराळा) येथील प्रसिद्ध चित्रकार, काष्ठशिल्पकार, कलाशिक्षक अशोक दादू जाधव यांनी टाकाऊ लाकडातून अप्रतिम अशी श्री गणेशाची काष्ठशिल्पे साकारली आहेत.
सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने टाकाऊ, निरुपयोगी लाकूड म्हणजे जळण असते परंतु हेच लाकूड जेव्हा कलात्मक दृष्टी लाभलेल्या अशोक जाधव यांच्यासारख्या सृजनशील कलावंताच्या नजरेस पडते, तेव्हा मन, मेंदू व कल्पनाशक्तीच्या आदेशानुसार त्यांच्या जादूई हातांचा खेळ सुरू होतो... अन् त्या टाकाऊ, निर्जीव लाकडात प्राण फुंकले जातात आणि बघता बघता त्याला देवपण प्राप्त होते. जाधव यांनी गणेशाची विविध आकर्षक, मनमोहक काष्ठशिल्प साकारली आहेत. परंतु त्यांना कोठेही कृत्रिमतेची जोड दिलेली नाही. हे त्यांच्या या काष्टशिल्पांचे वैशिष्ट्ये आहे. निसर्गाच्या विलक्षण अदाकारीला आपल्या कल्पकतेची जोड देऊन अशोक जाधव यांनी बनवलेली गणरायाची काष्ठशिल्पे ही आगळी वेगळी व आकर्षक आहेत. धनगरी फेट्यातील गणराया, बालकृष्ण रूपातील गणेश एकदंत, नारळाच्या झावळीतून साकारलेला लंबोदर, अण्णा हजारेंच्या प्रतिकारात्मक रूपातील विघ्नहर्ता, उजव्या सोंडेचा गजमुख अशी गणपतीची आकर्षक रुपे त्यांनी टाकाऊ लाकडातून साकारली आहेत. त्यांना पॉलिस व सुंदर रंगकाम करून अधिक सुंदर बनवली आहेत.
काष्ठशिल्पा व्यतिरिक्त पिंपळाच्या पानावरही जाधव यांनी श्री गणेशाची अप्रतिम अशी कलाकृती रेखाटली आहे .
.............
निसर्गाच्या आविष्कारातून एकदा साकारलेली कलाकृती पुन्हा दुसऱ्यांदा आहे तशीच हुबेहूब सापडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा अनमोल कलाकृतींचे वैशिष्ट्यपूर्ण असे भव्य कलादालन चिंचोली येथे निर्माण करण्याचा आपला मानस आहे.
काष्ठशिल्पकार अशोक जाधव
फोटो ओळी : काष्ठशिल्पकार अशोक जाधव यांनी टाकाऊ लाकडातून साकारलेली गणरायाची विविध रूपे.