राज्यातील दुधात युरिया, रसायनांची भेसळ गंभीर बाब - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:08 IST2025-02-07T12:07:47+5:302025-02-07T12:08:59+5:30

सोसायट्या राजकारणाचे अड्डे नको..

Adulteration of urea and chemicals in milk in the state is a serious matter says Cooperation Minister Babasaheb Patil | राज्यातील दुधात युरिया, रसायनांची भेसळ गंभीर बाब - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

राज्यातील दुधात युरिया, रसायनांची भेसळ गंभीर बाब - सहकारमंत्री बाबासाहेब पाटील 

कोल्हापूर : देश, राज्यात मागणीपेक्षा दुधाचे उत्पादन अजूनही कमी आहे. यामुळे युरियासह विविध रसायनांची भेसळ दुधात करून विक्री केली जात आहे. यावर सरकारचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.

कोल्हापूर दौऱ्यावर असताना मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी कार्यालयास भेट दिली. मंत्री पाटील म्हणाले, अनेक दूध संघ चांगले आहेत, तिथे चांगला दर मिळत आहे. आमच्या खासगी दूध संघात चांगला दर मिळतो; पण आमच्याकडील काही दूध संघाचे चालक दुधाचे पैसे स्वत:च्या प्रपंचाला वापरतात. दूध उत्पादकाचे बिल वेळेत मिळत नाही. आपल्याकडे अजूनही राज्य, जिल्हा बँक आणि सेवा सोसायटी असे कर्जाचे वितरण होते. यामुळे कर्जाचा व्याज दर वाढत आहे. यामध्येही सुधारणा करण्याचा विचार सुरू आहे.

शहर अध्यक्ष आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, भय्या माने यांची भाषणे झाली. बैठकीस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मुश्रीफ निवडून येतील असे वाटले नव्हते..

मंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. म्हणून यावेळी हसन मुश्रीफ निवडून येतील असे मलाही वाटले नव्हते; पण ते सर्व समाजाला घेऊन विकास कामे करतात. म्हणून ते निवडून आले. मंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात लवकरच राष्ट्रवादीचे स्व मालकीच्या जागेत कार्यालय बांधले जाईल.

विक्रमसिंह घाटगे यांची आठवण

कोल्हापुरात शिक्षण आणि कुस्तीसाठी होतो. यामुळे या शहराशी माझे जवळचे नाते आहे. येथील सहकाराचा आदर्श घेऊन माझ्या भागात अनेक संस्था उभ्या केल्या. चांगल्या चालवत आहे. यापूर्वीही मी दिवंगत विक्रमसिंह घाटगे, दिवंगत. सा. रे. पाटील यांच्या कार्यक्रमासाठी आलो आहे. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विरोधकांच्या घरात जाऊन सत्कार न स्वीकारता आपल्या पक्षाच्या कार्यालयात आलो, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

सोसायट्या राजकारणाचे अड्डे नको..

जिल्ह्यात १३०० सेवा सोसायट्या आहेत. यापैकी ५०० हून अधिक सोसायट्या विविध व्यवसाय करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत. हे कौतुकास्पद आहेत. सर्व सोसायट्या राजकारणापेक्षा विकासाचे अड्डे झाले पाहिजे, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Adulteration of urea and chemicals in milk in the state is a serious matter says Cooperation Minister Babasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.