ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 11:40 AM2023-04-08T11:40:55+5:302023-04-08T11:41:12+5:30
आज, शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव रघुनाथराव घोरपडे यांची शुक्रवारी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधनसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा सच्चा, एकनिष्ठ आणि पक्षनेतृत्वावर निस्मीम भक्ती असणारा कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
ॲड. गुलाबराव घोरपडे यांना गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे शिवाजी पार्क येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी मंत्री सतेज पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते रुग्णालयात पोहचले.
गुलाबराव घोरपडे हे मूळचे कागल तालुक्यातील माद्याळ येथील सरकार घरण्यातील होते. कोल्हापूरला शिक्षणासाठी आले, पुढे ते वकील झाले. त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्याने ते काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. १९७८ पासून ते सर्वसामान्य सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करू लागले. पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात त्यांचा पुढाकार राहिला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते निकटवर्तीय होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते सलग २० वर्षे सरचिटणीस होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ते दहा वर्षे अध्यक्ष राहिले. दहा वर्षे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीवर सदस्य म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह राज्यात विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध राहिले.
आज दुपारी कोल्हापुरात अंत्यसंस्कार
आज, शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तत्पूर्वी नागाळा पार्क, महावीर कॉलेजच्या मागे असलेल्या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.