गळतीचा फायदा कर्नाटकला

By admin | Published: December 30, 2015 12:17 AM2015-12-30T00:17:14+5:302015-12-30T00:25:04+5:30

बरगे घालूनही गळती : राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया

The advantage of leakage to Karnataka | गळतीचा फायदा कर्नाटकला

गळतीचा फायदा कर्नाटकला

Next

संदीप बावचे -- शिरोळराजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून अद्यापही लाखो लिटर पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे. सांगली पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अद्यापही सर्वच बरग्यांतून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.
गळतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने कर्नाटकातील गावांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे.
राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला पाणी तटवून तालुक्यातील बहुतांशी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर सांगली पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. प्रत्येकवर्षी उन्हाळ््यात पाणी सोडण्यावरून वाद निर्माण होतो. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असताना साडेनऊ फुटांपर्यंत पाणी तटवून ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरच पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे होतात, अशी वस्तुस्थिती आहे. आमदार उल्हास पाटील यांच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर बरगे घालण्यात आले आहेत. मात्र, या बरग्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे.
बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारा विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. या गळतीचे अधिकाऱ्यांकडून गांभीर्य न घेतल्याने पाणी असेच वाहत राहिले, तर शिरोळ तालुक्याला शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भविष्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून किमान मोठी गळती थांबविण्याचे व त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बंधाऱ्यावर लोखंडी बरगे घालण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे चांगल्या पद्धतीची बरगे याठिकाणी बसले नाहीत.

आमदारांनी वेधले लक्ष
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याची दखल घेत राजापूर बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबतचे निवेदन आ. उल्हास पाटील यांनी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी दिले आहे. पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. एका बाजूला राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी कर्नाटक राज्यात वाया जात असल्याचे अधिवेशनात आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.

Web Title: The advantage of leakage to Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.