मल्टीस्पेशालिस्ट वैद्यकीय सेवेचे प्रणेत
By admin | Published: January 28, 2015 12:36 AM2015-01-28T00:36:03+5:302015-01-28T01:00:42+5:30
गजाननराव जाधव : शहरातील एक प्रुिथतयश धन्वंतरीे
कोल्हापूर : जुन्या काळातील सुप्रसिद्ध सर्जन आणि कोल्हापूरच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या जाधव हॉस्पिटलचे जनक डॉ. गजाननराव जाधव यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी ते ८४ वर्षांचे होते. वैद्यकीय सुविधांचा अभाव असणाऱ्या तसेच मल्टीस्पेशालिटीचा जमाना नसलेल्या काळात डॉ. जाधव यांनी सर्वप्रकारच्या आजारांवर उपचार करून जनतेला वैद्यकीय सेवा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ताराबाई पार्क येथे वास्तव्यास असणाऱ्या डॉ. जाधव यांनी १९५५ साली इंदोर येथून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे छत्रपती शासकीय रुग्णालयात काही काळ वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. पुढे १९६० मध्ये आॅस्ट्रीया देशातील व्हिएन्ना येथील विद्यापीठातून एम.एस.ही पदवी मिळविली. तेथून त्यांनी आॅर्थोपेडिक सर्जन म्हणूनही पदवी मिळविली.
उच्च शिक्षण घेऊन ते कोल्हापुरात परत आले. डॉ. जाधव यांनी १९६५ मध्ये दसरा चौक येथे ९० बेडच्या एका सुसज्ज अशा सरस्वती हॉस्पिटलची स्थापना केली. त्याला ‘जाधव हॉस्पिटल’ म्हणूनही ओळखले जात असे. जुन्या काळातील ते सर्वांत मोठे हॉस्पिटल होय.
डॉ. गजाननराव जाधव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर २५ वर्षे, तर एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर १५ वर्षे सदस्य म्हणून काम केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, इंडियन डेंटल कौन्सिलवरही त्यांनी काम केले. कोल्हापूर मेडिकलचे ते अध्यक्ष होते. लायन्स क्लबचे प्रांतपाल, कोल्हापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांची आपल्या कार्याचा ठसा उमटविला. वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्कार देऊन कोल्हापूर महानगरपालिकेने त्यांचा गौरव केला होता.
डॉ. जाधव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी लतादेवी, पुत्र डॉ. रवीकुमार व राज, सुना, नातवंडे, भाऊ असा बराच मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. (प्रतिनिधी)