हवामान यंत्राचा शेतकऱ्यांना फायदा : काकडे
By admin | Published: September 27, 2016 12:37 AM2016-09-27T00:37:38+5:302016-09-27T00:43:41+5:30
दत्त कारखान्यात उद्घाटन : मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांना मिळणार माहिती
शिरोळ : शेतकऱ्यांना शेतातील पिके घेण्यासाठी अनेकवर्षे नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागत होता. शेतीचे वेळापत्रक कोलमडत होते. यावर उपाय म्हणून श्री दत्त साखर कारखान्याने महाराष्ट्रातील पहिले अद्ययावत असे अॅटोमेटिक हवामान यंत्रणा कक्ष उभे करून हवामानाचा अचुक अंदाज देणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन शेती उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन शिरोळचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी केले.
शिरोळ येथील कारखान्याच्या कार्यस्थळावर बसविण्यात आलेल्या हवामान यंत्रणा कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी काकडे बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, गटविकास अधिकारी राहुल देसाई, शंतनू पेंढारकर, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, तालुका कृषी अधिकारी आर. एस. राजमाने प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी गणपतराव पाटील म्हणाले, या हवामान यंत्रणेद्वारे कारखान्यापासून सरासरी २५ किलोमीटर परिसरातील सध्याचे तापमान, हवेचा वेग, दाब, दिशा, आर्द्रता, सूर्य प्रकाशाची तीव्रता, पर्जन्यमान याची अद्ययावत माहिती सभासदांना त्यांच्या मोबाईल अॅपद्वारे मिळणार असून, यामध्ये मागील सर्व संग्रहित डाटासुद्धा उपलब्ध होणार आहे. दत्त कारखान्याने नवनवीन प्रकल्प राबवून शेतकरी सभासदांच्या लाभासाठी पूर्णत्वाकडे नेले आहेत. सेंद्रिय खतांचा वापर करून शेती कशी करावी, त्या शेतीतून ६० टनाच्या वर ऊस टनेज कसे घेता येईल, यासाठी पाच शेतकरी प्रायोगिक तत्त्वावर दत्त कारखान्याच्यावतीने घेऊन नापीक जमिनी सुपीक कशा करता येतील, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.
यावेळी उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक युसूफसाहेब मेस्त्री, अनिलकुमार यादव, श्रेणिक पाटील, बाबासो पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, बसगोंडा पाटील, शेखर पाटील, प्रमोद पाटील, आण्णासाहेब पवार, इंद्रजित पाटील, अरुणकुमार देसाई यांच्यासह
सभासद व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)