आघाडी सरकारच्या प्रगतीचा आलेख झळकला रेल्वे डब्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 12:57 PM2022-02-10T12:57:45+5:302022-02-10T12:58:09+5:30
‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षं जनसेवेची, महाविकास आघाडीची’ ही टॅग लाईन
संदीप आडनाईक
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच दोन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. या दोन वर्षांत सरकारने घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांचा व लोकोपयोगी योजनांच्या प्रगतीचा आलेख थेट सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे पहिल्यांदाच राज्यात पाच एक्स्प्रेस गाड्यांची निवड करण्यात आली.
हा उपक्रम १ फेब्रुवारी ते १ मार्च या महिन्याभरात राबविण्यात येत आहे. सोमवार, दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी कोल्हापुरातून या उपक्रमास प्रारंभ झाला. दुपारी २.४५ वाजता गोंदियाकडे निघालेल्या महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांवर ही माहिती प्रदर्शित करण्यात आली होती.
पाच एक्स्प्रेस गाड्यांची निवड
दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस, मुंबई-लातूर एक्स्प्रेस, मिरजमार्गे धावणारी कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-कोयना एक्स्प्रेस ,कोल्हापूर-गोंदिया या लांब पल्ल्याच्या पाच एक्स्प्रेसच्या रेल्वेच्या डब्यांवर ‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’, ‘दोन वर्षं जनसेवेची, महाविकास आघाडीची’ ही टॅग लाईन असलेल्या विविध लोकोपयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश झळकविण्यात आला आहे.
‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ टॅग लाईन
शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा, आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणी, लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी यासह आरोग्यास कोरोना काळात देण्यात आलेले प्राधान्य, चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुनर्लागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात, महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदत ठेव योजना, जिथे ‘सारथी’ तिथे प्रगती,
क्षमता आणि कौशल्य, वृद्धीसाठी शिक्षण- प्रशिक्षण, आदींची माहिती देण्यासोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामानबदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र यासह दोन वर्षांतील सरकारने केलेल्या वेगवेगळ्या विविध विकास योजना, कामे यांची माहिती रेल्वेच्या डब्यांवर प्रदर्शित करण्यात आली आहे.