राधानगरी अभयारण्यातील झाडांना खिळे ठोकून वेदना, खिळेमुक्त झाड मोहीम कागदावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 01:04 PM2022-02-01T13:04:18+5:302022-02-01T13:04:47+5:30
गौरव सांगावकर राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यास सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे ...
गौरव सांगावकर
राधानगरी : महाराष्ट्रातील सर्वांत जुने अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या राधानगरी अभयारण्यास सध्या एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. अभयारण्य क्षेत्रातील झाडांची फांदी तोडणेही गुन्हा आहे; पण जाहिरातीचा नवीन फंडा या झाडांसाठी मरणयातना देत आहे. ही केवळ वन विभागाचीच जबाबदारी आहे असे म्हणून चालणार नाही. हा विपुल साठा जतन करणे आपलेही कर्तव्य आहे; पण आपल्या प्रगतीच्या हव्यासापोटी येथील विपुल संपत्तीचा ऱ्हास होत आहे.
शेतकऱ्यांना मात्र या ना त्या कारणासाठी हेच वन्यजीव विभाग वेठीस धरतात; पण या हॉटेल व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, कॉम्पुटर क्लास, सैनिक भरती अकॅडमी यांचा या जाहिरातींमध्ये जास्त भरणा आहे. माणसाला जशी दुखापत होते, वेदना होते, त्याचप्रमाणे झाडांनाही वेदना होतात. याच वेदना झाडांना देण्याचे काम माणूस करीत आहे. वन्यजीव विभाग या सर्वांवर कारवाई का करत नाही हा खरा प्रश्न पर्यावरणप्रेमींमध्ये आहे.
निपाणी-देवगड हा राज्यमार्ग राधानगरी अभयारण्यातून जातो. तसेच राधानगरी जलाशय, राऊतवाडी धबधबा, काळम्मावाडी धरण या परिसरातील बहुतांशी झाडांवर या वेगवेगळ्या जाहिराती खिळे ठोकून अडकवलेल्या दिसतात. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. कोणताही विचार न करता प्रत्येक झाडावर ३-४ जाहिरातींचे फलक अडकविण्यात आले आहेत. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या आर्किड असलेल्या झाडांवरही खिळे ठोकून जाहिरात करण्यात आली आहे. शंभर वर्षांपेक्षा जुनी असलेली ही वृक्षसंपदा यामुळे नष्ट होत आहे. कोणताही विचार न करता पोस्टरबाजीसाठी मोठमोठे खिळे या झाडांवर ठोकले जात आहेत. वनविभागाच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडत आहे.
खिळेमुक्त झाड मोहीम कागदावरच..
जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त खिळेमुक्त झाड अशी मोहीम कोल्हापूर शहर व परिसरात राबवली होती; पण कोल्हापूर जिल्ह्याचे हृदय असणाऱ्या राधानगरीतील या झाडांचे पालकत्व वन्यजीव विभाग अगदी प्रामाणिकपणे स्वीकारणार का? फक्त दरवेळीप्रमाणे कागदी घोडे नाचवून कारवाईची भीती दाखवून पुन्हा या झाडांना मरण यातना झेलतच ठेवणार हा खरा मुद्दा आहे.
जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य याचे संगोपन केवळ वन्य विभागाने नव्हे तर नागरिकांनीही त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. खिळे मारल्यामुळे ही झाडे काही दिवसांनंतर सुकलेली दिसतात. यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. वृक्षांवर खिळे मारणे हा प्रकार निसर्गासाठी नव्हे तर मानवासाठीही घातक ठरेल. - प्रा. पी. एस. पाटील. राधानगरी परिसर संवर्धन समिती सचिव