जाहिराती शब्दबंबाळ नको, भावनात्मक हवी

By admin | Published: October 15, 2016 12:53 AM2016-10-15T00:53:37+5:302016-10-15T00:53:37+5:30

शिवदत्त प्रभू यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त ‘लोकमत’चे कित्तुरे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार

Advertisements No Keywords, Emotional Need | जाहिराती शब्दबंबाळ नको, भावनात्मक हवी

जाहिराती शब्दबंबाळ नको, भावनात्मक हवी

Next

 
कोल्हापूर : मानवी मेंदू एकाच वेळी तीनपेक्षा अधिक गोष्टी समजून घेऊ शकत नाही; त्यामुळे तुमची जाहिरात प्रभावी ठरण्यासाठी त्या शब्दबंबाळ करण्यापेक्षा भावनात्मक, कमी व साध्या शब्दांत करा, असे आवाहन मेंदूतज्ज्ञ डॉ. शिवदत्त प्रभू यांनी शुक्रवारी येथे केले.
फेडरेशन आॅफ अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅँड मार्केटिंग एंट्रपु्रनर्स (फेम) व अ‍ॅड एजन्सीज असोसिएशन आॅफ साउथ महाराष्ट्र (आसमा)तर्फे आयोजित राष्ट्रीय जाहिरात दिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. हॉटेल पॅव्हेलियनमधील कार्यक्रमास दामोदर शिवराम अ‍ॅँड कंपनीचे भागीदार सुबोध गद्रे, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील, कोल्हापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चारूदत्त जोशी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. प्रभू म्हणाले, शरीराच्या वजनापेक्षा दोन टक्के वजन असणारा मेंदू हा शरीरातील २० टक्के ऊर्जा वापरतो. यातील बहुतांश ऊर्जा मेंदूच्या दैनंदिन प्रक्रिया, निर्णयक्षमतेमध्ये खर्च होते. अशा स्थितीत मेंदूकडून विपणनविषयक संदेश फारसे स्वीकारले जात नाहीत. कधीही जाहिरातीत स्थानिक भाषा आणि भावभावना, संस्कृतीचे प्रतिबिंब उमटले तर ती लोकांना जास्त भावते. सध्याची जगण्यासाठीची धावपळ लक्षात घेऊन या दृष्टीने जाहिरात करण्यावर जाहिरात संस्थांनी भर द्यावा.
सुबोध गद्रे म्हणाले, आमच्या चहासह विविध उत्पादनांच्या व्यवसाय वाढीत जाहिरातीचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. आम्ही डोळसपणे, समाजाचा अभ्यास करून जाहिरात करण्यामध्ये कोणतीही तडजोड केली नाही.
अशा स्वरूपातील प्रयोगशील जाहिराती फायदेशीर ठरल्या. जाहिरातीत कल्पकता असणे आवश्यक आहे.’
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर ‘लोकमत’चे उपवृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे यांच्यासह अनिल पाटील (समूह सरव्यवस्थापक, पुढारी), गुरुबाळ माळी (सहायक संपादक, महाराष्ट्र टाइम्स), आनंद साजणे (जाहिरात व्यवस्थापक - तरुण भारत), संतोष पोवार (बातमीदार, पुण्यनगरी), सुनील ठाणेकर (वरिष्ठ कॅमेरामन, बी न्यूज), सुधाकर काशीद (विशेष प्रतिनिधी, सकाळ),मानसिंग पानसकर (पॅन प्रिंट), अविनाश शिंत्रे-गुंडाळे (अविज कॉम प्रिंट), उदय मराठे (उदय प्रोसेस), विलास बकरे (श्री प्रोसेस), प्रकाश धोपेश्वरकर (एक्सेल ग्राफिक्स) यांना डॉ. प्रभू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप
होते.
यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, विविध जाहिरात संस्थांचे प्रतिनिधी अभय मिराशी, राजाराम शिंदे, अनिरुद्ध गुमास्ते, अविनाश पेंडुरकर, प्रकाश पवार, धनंजय पाटील, सुहास कोगनूळकर, मोहन कुलकर्णी, संजीव चिपळूणकर, कौस्तुभ नाबर, प्रशांत बुचडे, सुहास लुकतुके, इव्हेन्ट चेअरमन उदय जोशी, आदी उपस्थित होते.
‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी कोल्हापुरातून सुरू झालेला ‘राष्ट्रीय जाहिरात दिन’ आता राज्यभर साजरा केला जात असून, तो देशभरातही साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला. अनंत खासबारदार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कोल्हापूरकर ‘स्मार्ट’
मेंदू गुडघ्यात आहे. ते संस्थानिक आहेत, त्यांना शिस्त नाही,
अशा स्वरुपातील आरोप कोल्हापूरकरांवर होतात.
मात्र, त्यात काहीही तथ्य नसल्याचे डॉ. प्रभू यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूरकर ‘स्मार्ट’ आहेत. हे त्यांनी जाहिरातीसह विविध क्षेत्रांतील कामगिरीद्वारे दाखविले आहे. सांस्कृतिकदृष्ट्या वास्तव लक्षात घेऊन कोल्हापुरातील जाहिरात संस्थांचे कामकाज आदर्शवत ठरणारे आहे.

Web Title: Advertisements No Keywords, Emotional Need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.