अंबाबाई मंदिर संवर्धनासाठी ‘हेरिटेज’चा सल्ला

By admin | Published: July 22, 2016 12:33 AM2016-07-22T00:33:57+5:302016-07-22T00:53:52+5:30

देवस्थान समितीचा निर्णय : लवकरच अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आराखड्याचे काम

The advice of 'Heritage' for the conservation of Ambabai temple | अंबाबाई मंदिर संवर्धनासाठी ‘हेरिटेज’चा सल्ला

अंबाबाई मंदिर संवर्धनासाठी ‘हेरिटेज’चा सल्ला

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व अंतर्गत परिसराच्या जतन, संवर्धन व सुशोभीकरणासाठीचा आराखडा देवस्थान समितीतर्फे बनवून घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या हेरिटेज समितीचा सल्ला घेऊन वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आराखड्याचे काम होणार आहे. देवस्थानच्या बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात सध्या नियोजन सुरू आहे. त्यानुसार मंदिराच्या अंतर्गत परिसराचा विकास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने करायचा आहे. त्यासाठी समितीने पाच कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेने मंदिराच्या बाह्य परिसराचा आराखडा ज्यांच्याकडून बनवून घेतला, त्या फोट्रेस कंपनीलाच अंतर्गत परिसराच्या संवर्धनाचे काम देण्यात येणार होते. मात्र, बाह्य आराखड्याबाबत नागरिकांच्या आलेल्या हरकतींमुळे हा विषय आता मागे पडला आहे. मंदिर परिसर आणि बाह्य आराखडा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या संस्थांच्यावतीने राबविण्यात येणार असल्याने देवस्थान समितीला मंदिरवास्तू जतन, संवर्धन व सुशोभीकरणात कोणताही अडथळा येणार नाही. त्यामुळे आता मंदिराचे काम सुरू करण्याचा देवस्थानचा विचार आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांच्याकडून मंदिराचा आराखडा बनवून घेण्यात येणार आहे. मंदिर हेरिटेज वास्तूत समाविष्ट असल्याने तत्पूर्वी महापालिकेच्या हेरिटेज समितीशी सल्लामसलत करण्यात येणार आहे.


अंबाबाई ‘तीर्थक्षेत्र’ विकास आराखड्याचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर; बैठकीची प्रतीक्षा
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या आराखड्यावर आलेल्या भाविकांच्या सूचनांचा अहवाल महापालिकेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सादर केला आहे. मात्र, अद्याप त्यावर निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले नाही.
अंबाबाई मंदिराच्या २५५ कोटींच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे २३ जूनला जनतेसमोर सादरीकरण झाले. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनतेने आठ दिवसांच्या आत आराखड्याशी संबंधित सूचना महापालिकेला सादर कराव्यात, असे आवाहन केले होते.
त्यानुसार २ जुलैपर्यंत तब्बल २० हून अधिक नागरिकांनी व संस्था, संघटनांनी आपल्या सूचना व हरकती महापालिकेकडे दिल्या आहेत. त्या सर्व सूचनांचा विस्तृत अहवाल प्रकल्प विभागाकडून बनविण्यात आला आहे.
हा अहवाल शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर मांडला आहे. जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी व आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह फोट्रेस कंपनीला त्या अहवालाची प्रत पाठविण्यात आली आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनतेच्या भावना विचारात घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. मात्र, अद्याप त्यावर अंतिम बैठकीचे नियोजन करण्यात आलेले नाही. दरम्यान, पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा व मनपा प्रशासनालाही बैठकीसाठी वेळ मिळालेला नाही.


मंदिराच्या अंतर्गत परिसराचा आराखडा देवस्थान समितीतर्फे राबविण्यात येणार आहे. पुरातत्त्व खात्याची मान्यता घेतल्यानंतर वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांची नियुक्ती करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाईल.
- शुभांगी साठे ,सचिव, देवस्थान समिती


सीसीटीव्ही कॅमेरे बदलणार
दरम्यान, मंदिरांच्या वायरिंग, लायटिंगच्या किरकोळ दुरुस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आगामी काळात परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बदलून त्याजागी हाय रिजोल्युशन असलेले कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

Web Title: The advice of 'Heritage' for the conservation of Ambabai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.