पानसरे खटल्यात महाधिवक्ता मांडणार सरकार पक्षाची बाजू
By Admin | Published: January 15, 2016 12:53 AM2016-01-15T00:53:31+5:302016-01-15T00:53:41+5:30
सरकारतर्फे नियुक्ती : सुनावणी लांबणीवर
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने आता महाधिवक्ता श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या रजेवर असल्याने या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापुरात चालणार की अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला.
सुनावणी असल्याने श्रीमती पानसरे व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी न्यायालयात गेले होते; परंतु सकाळीच त्यांना ही सुनावणी होणार नसल्याचे समजले. या खटल्यात महाधिवक्ताची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्यावतीने त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा खटला निष्पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशा मागणीची याचिका संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने १२ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी बुधवारी (दि. १३) दाखल केले आहे. हा खटला कोल्हापूरबाहेर हलविण्यास पानसरे कुटुंबीयांचा विरोध आहे. खटला मुंबई किंवा अन्यत्र हलविण्यामुळे शोधयंत्रणा व अन्य साक्षीदारांवर त्याचा परिणाम होईल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गायकवाड याच्यावतीने मुंबईतील सनातन संस्थेचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी ही याचिका (क्रमांक ८४०/२०१५) दाखल केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिका कोल्हापुरात का नको, याची चार कारणे त्यांनी या याचिकेत दिली आहेत. पानसरे यांच्यावर गतवर्षी दि. १६ फेब्रुवारीस ते सकाळी त्यांच्या सागरमाळ परिसरातील बंगल्यातून फिरायला गेल्यावर गोळ््या झाडण्यात आल्या. त्यांचा त्यामध्ये दि. २० फेब्रुवारीस मृत्यू झाला. याप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक असलेल्या समीर गायकवाड यास राजारामपुरी पोलिसांनी दि. १४ सप्टेंबर २०१५ ला अटक केली. त्याच्यावर या खूनप्रकरणी राज्य गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. सध्या गायकवाड कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
कोल्हापूर पोलिसांचा विरोध
हा खटला हलविण्यास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तपास अधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केले.
कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाड यास वकील मिळू नये, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बार असोसिएशनचे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.
महाधिवक्ता का...
एखादा खटला जेव्हा महत्त्वाचा असतो, त्यामध्ये घटनात्मक वैधतेविषयी काही मुद्दे उपस्थित होतात तेव्हा राज्य शासन सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महाधिवक्ताची नियुक्ती करते. हे घटनात्मक पद आहे. या खटल्यात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पानसरे कुटुंबीयांची बाजू बळकट झाल्याचे मानण्यात येते.