सल्लागार, ठेकेदारांची कानउघाडणी

By admin | Published: May 17, 2017 01:12 AM2017-05-17T01:12:08+5:302017-05-17T01:12:08+5:30

थेट पाईपलाईन योजना; आयुक्तांची नोटीस; देखरेखीसाठी ‘एमजीपी’चे निवृत्त अधिकारी ठेवणार

Advocates, Advocates of Contractors | सल्लागार, ठेकेदारांची कानउघाडणी

सल्लागार, ठेकेदारांची कानउघाडणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची पाहणी करताना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अनेक अधिकारी, कामाचे ठेकेदार तसेच सल्लागार यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी, कामाच्या दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देताना युनिटी सल्लागार कंपनीचे जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. योजनेवर देखरेखीसाठी महापालिकेच्या वतीने जीवन प्राधिकरणातील निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेला आणखी वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी जीकेसी या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त चौधरी यांच्याकडे केली.
थेट पाईपलाईन योजनेच्या पदाधिकारी व अधिकारी अशा (पान १० वर)
संयुक्त पाहणी दौऱ्यामध्ये पुईखडी टेकडीवरील ८० एमएलडी शुद्धिकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. ते काम ५० टक्के पूर्ण झाल्याची माहिती जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी दिली. येथे कराराप्रमाणे मनुष्यबळ व यंत्रणा या पुरविल्या नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली; तर कामात दिरंगाई होत असल्यास ठेकेदारास नोटीस काढा, अशा सूचना आयुक्त डॉ. चौधरी यांनी जलअभियंता कुलकर्णी यांना दिल्या. या कामांना गती येण्यासाठी ठेकेदार व सल्लागार अधिकाऱ्यांच्या गाड्यांनाही जीपीएस सिस्टीम बसवावी, अशी मागणी उपमहापौर अर्जुन माने यांनी केली.
थेट पाईपलाईन मार्गावर विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर सर्वांनी काळम्मावाडी धरणावरील कामाची पाहणी केली. धरणस्थळावर इंटकवेल (धरणातील पाणी जॅकवेलच्या कामावेळी येऊ नये म्हणून अडवलेला बंधारा), कनेक्टिव्हिटी पाईप्स, इन्स्पेक्शन वेल तसेच १८ मीटर व्यासाचे दोन जॅकवेलचे काम याबाबत जेकेसी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी यांनी माहिती दिली. त्यांनी कामासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली. युनिटी सल्लागार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने आयुक्त डॉ. चौधरी हे सल्लागार कंपनीच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांवर संतापले. पाहणी दौऱ्याची कल्पना असतानाही वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित असल्याबाबत त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश त्यांनी दिले.

—————————-
चौकट..
पैसे त्वरित मिळतात तेथेच प्रथम काम
नगरसेवक अभिजित चव्हाण यांनी रिंग रोडचे काम रेंगाळल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचे सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने राहुल चव्हाण भडकले. ते म्हणाले, थेट पाईपलाईनचे काम ३० महिन्यांत २५ किलोमीटर होते, तर भागातील काम ३० महिन्यांत एक किलोमीटरसुद्धा होत नाही. त्यावर थेट पाईपलाईनच्या कामात तातडीने पैसे मिळतात. मग भागातील कामे कशी होतील? असा टोला आदिल फरास यांनी लगावला. त्यावेळी रिंग रोडचे काम १५ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या.

योजनेच्या कामात काही अडचणी आहेत. ठिकपुर्ली येथे पुलाचे चुकीचे काम झाल्याने त्याचे त्रयस्थांमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिलेत. जमिनीतील पाईपलाईनखाली बेड काँक्रीट घातले आहे का, हे येत्या १५ दिवसांत खुदाई करून तपासणार आहे. ठेकेदार कंपनीने मनुष्यबळ खूपच कमी वापरले आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाल्यास त्यांच्यावर सभागृहाने एकत्र मिळून कारवाई करू. - हसिना फरास, महापौर, कोल्हापूर महापालिका


योजनेबाबत परवानग्या वेळेत मिळाल्या नाहीत. अद्याप ‘पाटबंधारे’ची परवानगी नाही. त्यामुळे वेळेत काम करू शकलो नाही. अरुंद रस्त्यातून पाईपलाईन स्थलांतरणाला अडचणी आल्या. जॅकवेल कामासाठी २१ मीटरची खुदाई केली आहे. अद्याप २६ मीटरची खुदाई करणे आवश्यक आहे. २६ किलोमीटरची पाईपलाईन टाकली आहे. अद्याप २८.५ किलोमीटरची बाकी आहे. इंटकवेलमध्ये पाणी अडवणे अवघड आहे, तरीही लवकरात लवकर दर्जेदार काम करू.
- राजेंद्र माळी,
प्रकल्प व्यवस्थापक, जीकेसी कंपनी.


योजनेतील २४ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित ठेकेदार, सल्लागारांनी कराराप्रमाणे काम आहे का, याची तपासणी केली. काम लवकर पूर्ण होण्यासाठी ठेकेदार कंपनीस पत्र देऊ. ग्रामस्थांची तक्रार चर्चेअंती सोडवू. तांत्रिकदृष्ट्या खराब काम आढळलेले नाही. वादग्रस्त पुलाच्या कामाचे खर्चाप्रमाणे बिल मंजूर करू. अतिरिक्त दिलेले बिल इतर कामांत वळवू.
- डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

Web Title: Advocates, Advocates of Contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.